धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे व लो.टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेतील कृष्णा महाजन, भावेश गवळे, मानव करोसिया, कोमल भोई, नंदिनी भोई, वैभव माळी यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते पी डी पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून त्यांचा संघर्ष अण्णांनी या देशाला दिलेले अनमोल साहित्य यासंदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली. कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे उत्कृष्ट कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, लेखक, पत्रकार, लोकनाट्याचे जनक, आद्य शिवशाहीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न आहेत, सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आहेत असे प्रतिपादन पाटील यांनी केले. प्रा.अशोक पवार युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महापुरुषांच्या विचारांचा जागर धरणगाव तालुक्यातील ५० शाळांमध्ये संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालले पाहिजे हीच खरी महापुरुषांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले. शाळेतील शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.एन कोळी तर आभार एस व्ही आढावे यांनी मानले.