अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड : संत सावता माळी यांनी आपल्या कर्मातूनच देवत्व प्राप्त केलं. विठ्ठलाला आपल्या हृदयात साठवून ठेवणारे ते एकमेव संत होते. आपल्या हृदयात देवाची साठवण करायची असेल तर तर हृदय स्वार्थाशिवाय रिकामं असावं लागतं, असे प्रतिपादन ह. भ. प. दिलीप महाराज जोशी ईसादकर यांनी केले.
गंगाखेड येथील संत सावता माळी मंदिरात आज सावता माळी यांची पुण्यतिथी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजीत किर्तन समारोहात ते बोलत होते. पंढरपुराला न जाता साक्षात विठ्ठलाला आपल्या शेतात बोलावण्याची शक्ती सावता माळी यांच्या भक्तीत होती. भक्ती करत असताना आपले कर्म न सोडणे, हे सावता माळी यांच्या भक्तीचे मोठे वैशिष्टय होते. कष्टकऱ्यांनी भक्ती करत असताना आपले कर्म सोडू नयेत, हाच यातील संदेश असल्याचे दिलीप महाराज जोशी यांनी स्पष्ट केले.
खडकपूरा गल्लीतील संत सावता माळी मंदिरात सकाळपासून विविध धार्मीक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी किर्तन, महाप्रसाद झाला. तर संध्याकाळी महिला मंडळाच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तरूण व समाजातील विविध घटकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.