सध्याचा जमाना कशाचा आहे हेच कळत नाही. कोणी म्हणतंय हे एकविसावे शतक आहे. नवनवीन शोधांचे, तरुणांचे, तंत्रज्ञानाचे शतक आहे. सध्याची पिढी सुधारलेली, प्रगल्भ विचारांची, सुचारू मानसिकतेची आहे असेही म्हणतात. पण जेव्हा याच सो कॉल्ड सुधारलेल्या जगाकडे पाहतोय तेव्हा यातले चांगले दिसावे हेच दुर्लभ आहे. कमालीची उत्सुकता सोडून द्या पूर्ण उदासीनता आहे. आपल्या कामात कमी इतरांच्या कामात लक्ष जास्त आहे. मोठेपणा कशात घ्यावा, कोणाला द्यावा, कशासाठी द्यावा हे कळणारे जन्माला येणे सध्या बंद झाले आहे. सध्याचे सांगायचे म्हणजे नुसते फुकटे, टवाळक्या करणाऱ्या टोळीखोर पोरांचे युग आहे. जी पोरे मोठी तर झालीत पण त्यांच्यातला पोरंसोरपणा तोच आहे. अल्लड म्हटले तर एकवेळ समजून घेवूत पण हुशार म्हणवलेले सर्व वयांचे एकसारखेच वागत आहेत. एवढे बोलण्याचा व अजून जास्त खोलात न जाण्याचा हेतू एकच आहे. कारण सांगायचे हेच की आजचे युग ‘निव्वळ सोशल मीडियाचे’ आहे. कामे करून चार वाजविणे बार बार हेच चालू आहे. सर्व विळखा याच लाईक्स – डिसलाईक्स आहे. जो तो यामध्ये गुंग झाला आहे. स्वतः ला रमविण्यासाठी लोकांना रमविणे हेच जीवन व हेच चोवीस तास झाले आहेत.
सोशल प्लॅटफॉर्म म्हटले की फेसबुक, इंस्टाग्राम, व सगळ्यात मोठा महाशय ‘व्हॉट्सॲप’ आलेच. लोकांच्या पोस्टला लाईक्स करून, खुशामती करून पाय ठेवू तिथे चार इतके पुष्कळ झालेत. तू मला चांगले म्हण मी तुला म्हणतो, एवढेच काय या सोशल युगात उरले. फुटकळ -बाष्कळ गप्पा आता बंद असल्यामुळे जो तो सोशल प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या लाईक्स – डिसलाईक्सवरून लहान मोठा होत आहे. म्हणून लाईक्स करावे लागतात कारण नंतर आपल्यालाही थोडेसे लाइक्स हवे असतात. वाचायची गरज असो की नसो लाइक्स ठोकणे हेच इथला जॉब आहे. कारण तुम्हाला लाइक्स पाहिजे असतील तर डिसलाइक्स करून जमणार नाही. सरासरी डिसलाइक्स कोणी करतही नाही. इथे लाईक न करणे म्हणजेच जवळपास डिसलाइक आहे. त्याच्यामागे कारण आताचे नाही जरा मागचेच आहे. कारण मागच्या त्या विवंचित पोस्टवर तुमचे ते मौनत्व आता कमालीचे डसत आहे. तेच इथे तुम्हाला महाग पडत आहे. उसने घेणे व वापस देणे इतके सोपे हे आहे.
आता वाढदिवसाचेच पहा. वर्षभरातला एक आपला तो दिवस. जीवनात काही चांगले केले तर साजरे करावे वाटणारा दिवस, अन् काहीच केले नसेल तर उरलेला तोच चांगला दिवस म्हणून साजरा करावा लागतो. साजरा तर लोकं करतात, आपण फक्त फुटका गाज व इचका नाच पहायचा असतो. मग रोज 364 दिवस हेच कॉपी पेस्ट करायचे असते. कशासाठी? तर त्या एका मोडक्या दिवसाला ओलं सुडकं लावून थंड ठेवण्यासाठीच! कधी -कधी तर चेहरेही अनोळखी असतात, फुलंही कृत्रिम आणि हसूही. कळस तर तेव्हा होतो जेव्हा माय बापाला लेकाचा जन्मदिवस माहीत नसतो अन् लेकाला त्यांचा. जणू काय जन्म हा फक्त स्वतः साठी, जन्मदिवस लोकांसाठी झाला असावा. स्टेटसचे दिवस विझवावे, वाजवावे, खुलवावे लागतात. रोजच एकसारखे हसरे ईमोजी दाखवावे लागतात. हे देखील फक्त माझ्या वाट्याला असेच यावे म्हणून. मोबाईल पाहून -पाहून डोळे कोरडे पडले तरी चालेल पण हात ॲक्टिव असावा लागतो. लोकांचे ॲक्टीव्हेेटर आपणच असल्याने आपल्याला ॲक्टिव्ह तर रहावेच लागेल. हातातली कामे तीनच्या जागी दोन झाली तरी चालवून घ्यावे लागते. पण व्हॉट्सॲपवरचे लाइक्स थांबवलेले चालत नाही.
एवढा सर्व व्याप, उदव्याप का करावा? कशासाठी करावा? ही समज आज संपली आहे. लोकं मनाने कलुषित असली तरी माझ्याकडे प्रेमाने पहा, एवढ्यासाठीच केविलवाणी होवून बसली आहेत. मुळात उसने घेणे व परत देणे हे फक्त उधारी नसते. मला पुन्हा पुन्हा लागेल यासाठी उसने तुम्ही घ्याचं ही जबरदस्ती म्हणजेच भिकारीपण आहे. श्रीमंती मनाची हवी असेल तर श्रीमंतांसारखे खुले, मनमोकळे, दिलखुलास कौतुक करावे. तू कुटका टाक, मग मी बी टाकतो म्हणून नाही. दोघेही सारखेच, मी बी फाटका अन तू बी! नुकसान तेव्हाच होते जेव्हा एखादी सुंदर गोष्ट लाइक्स नसल्याने लोंकांपर्यंत पोहचू शकत नाही. कारण याची लाइक्सवाल्या लोकांची भावकी नसते आणि ह्याने कधी कोणाची हमाली केलेली नसते. पण सुंदर ते सुंदर असते. कारण सुंदरता पहायला सुंदर असावे लागते आणि हे त्या लाइक्सवाल्यांना जमणार नाही.आणखी एक महत्वाचे, आवड नसेल तर तिथे सवड नसते, दाखवायला अन् पहायलाही. ती देखील एक श्रीमंती असते. मी रोज देत जाईल व एक दिवस मलाही भेटेल म्हणून लाळ टपकण्यात मजा नाही.
माणूस आपल्या स्व -कष्टाने मोठा होतो. त्याला जे जमते, जे मर्यादा आहे त्या मर्यादेपर्यंत, जे उपयोगी आहे त्या कौशल्याने मोठा होतो. ज्यांच्याकडे काहीच कौशल्ये नाहीत त्या कमेंट्सने परिणाम करून घ्यायचा नसतो. काहीच कमेंट्स नाही आली तर कमीपणाही मानायचा नसतो. स्वतः तील उत्कृष्टता शोधली की गाडी सुसाट धावते; मग तिला कुठलेच स्पीड- ब्रेकर आडवू शकत नाही. गाडी सुसाटच म्हणल्यावर तिला तरी कुठला वेळ असतो. ना ते बिनहंगाम दिवाळीचे लाईट लावण्याची सवड असते ना बंद करण्याची.
काही चांगले केले असेल तर आपल्या चुका विचारण्यासाठी लोकांना दाखवा. डोळे लावून लाइक्ससाठी नाही. लोकही ती, जी आपली आहेत. हापापलेली तर कुत्रीही असतात.
कुठे फसलात रे तुम्ही
निर्मळ मने सोडून…
चिखलात रुतलात तुम्ही…
स्वतः ला शहाणे म्हणताय
लाइक्स पाहून…
मग….?
गावंढळच तुम्ही….!!
अमोल चंद्रशेखर भारती, नांदेड
मो. 8806721206.