“घरोघरी तिरंगा अभियान” अंतर्गत जिंतूर तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

89
Advertisements

 

जिंतूर (प्रतिनिधी- सौ. अश्विनी जोशी)

 

जिंतूर (प्रतिनिधी- जिंतूर तालुक्यात “घरोघरी तिरंगा” अभियान अंतर्गत देशभक्ती जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय, नगरपालिका कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले. यामध्ये तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सेल्फीज व तिरंगा कॅनव्हास हे उपक्रम प्रभावी पद्धतीने राबविण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी तहसीलदार राजेश सरोदे, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, उपमुख्याधिकारी अनिल समिंदरे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, साहित्यीक मयूर जोशी, विविध वर्तमान पत्राचे पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तिरंगा रॅलीमध्ये जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तिरंगा मॅरेथॉन मध्ये जय हिंद डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तिरंगा सेल्फीज व तिरंगा कॅनवास या उपक्रमात जिंतूर शहरातील प्रतिष्ठित व जागरूक नागरिकांनी सहभाग घेतला.

भारत देशाला स्वातंत्र्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. फार मोठे स्वातंत्र्य समर लढावे लागले. या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. सर्वस्वाचा त्याग केला. तेव्हा कुठे आपला देश स्वतंत्र झाला. याचे जाण आणि भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा या मूल्यांची रुजवण आणि जोपासना झाली पाहिजे. घराघरात आणि मनामनात राष्ट्रनिष्ठा वाढली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मनामनात जिवंत राहिल्या पाहिजेत.
स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी यांनी केलेला त्याग, दिलेले बलिदान लक्षात राहावे. स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्व देशभक्तांनी चेतवलेले स्फुल्लिंग सर्व भारतीय जनसामान्य माणसाच्या मनात कायम तेवत राहावे. आपल्या दैदिप्यमान भारतीय इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण व्हावे. या उदात्त आणि विधायक उद्देशाने “घरोघरी तिरंगा” हे अभियान याही वर्षी दिनांक 09 ऑगस्ट 2024 ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या अभियानात सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्थापना, प्रतिष्ठाने यांना सहभागी होण्याचे अवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या तीन दिवस नियमानुसार राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. यासोबतच सर्व खाजगी आस्थापना आणि सर्व नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरोघरी तिरंगा ध्वज उभारायचा आहे. अशाप्रकारे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 1. तिरंगा यात्रा, 2. तिरंगा रॅली, 3. तिरंगा मेरेथान, 4. तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, 5. तिरंगा कॅनव्हास, 6. तिरंगा प्रतिज्ञा, 7. तिरंगा सेल्फिज, 8. तिरंगा ट्रिब्युट 9. तिरंगा मेळा हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.