आज श्रावण पौर्णिमा आजचा दिवस संपूर्ण देशात राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. राखी पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याला बंधनात बांधणारा हा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या आवडीची भेट देऊन तिला तिच्या सुरक्षेची हमी देतो त्यामुळे या सणाची बहीण भाऊ दोघेही आतुरतेने वाट पाहत असतात. विशेषतः जे बहीण भाऊ एकमेकांपासून लांब असतात त्यांना या निमित्ताने एकमेकांची भेट घेता येते. आपली सुख दुःख एकमेकांना सांगता येतात आणि जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. राखी पौर्णिमा या सणाला पौराणिक इतिहास आहे. पुरातन काळात जेंव्हा स्त्री स्वतःला असुरक्षित मानत होती तेंव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानत असे जो तिची रक्षा करील. इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या समर्थ्याने वज्रासुर राक्षसाचा पराभव केला तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली असे मानले जाते. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायून बादशहाला राखी पाठवली व हुमायून बादशहाने देखिल आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले. राखी पौर्णिमेचे असे अनेक दाखले पुराणात आणि इतिहासात पाहायला मिळतात. राखी पौर्णिमेला रक्षा बंधन असेही म्हणतात. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. राखी पौर्णिमेच्या दिवशी राखीचा धागा बांधून भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो म्हणूनच या सणाला रक्षा बंधन असेही म्हणतात. रक्षा करणे जबाबदारी स्वीकारणे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी स्विकारतो. वडीलांच्या पश्चात भाऊ आपल्या बहिणीची सर्व परिस्थितीत जबाबदारी स्वीकारतो तर आईच्या पश्चात भावास आईचे निरपेक्ष प्रेम देणे, काळजी घेणे याची जबाबदारी बहीण स्वीकारते म्हणून याला रक्षा बंधन असे म्हणतात. या दिवशी बहीण आणि भाऊ एका पवित्र बंधनात बांधले जातात म्हणून या सणाला बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या सण असे म्हटले जाते. राखी बंधनाच्या या पवित्र सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत होते. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले जाते. अशी ही देवतुल्य स्त्री म्हणजे बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदरचा नसून भावाच्या मस्तकातील सदविचार व सदबुद्धि जागृत राहण्यासाठीची ही पूजा असते. राखीचा धागा हा नुसताच सुताचा धागा नसून ते शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे बंधन आहे. ह्या एव्हढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होतो. एकमेकांना जोडणारा हा सण सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवणारा आहे. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्याला सख्खी बहीण नाही किंवा जिला सख्खा भाऊ नाही ती बहीण मानस भावाला राखी बांधते आणि बहीण भावाचे पवित्र नाते वृद्धिंगत करते असा हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सणाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५