_रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ सन १९५५–८५पर्यंत नोकरीत होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. त्यांची थोडीशीच पण ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या संकलित लेखात अवश्य वाचा… संपादक._
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे एक श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे दि.६ जुलै १९२७ रोजी झाला. औपचारिक शिक्षण फारसे मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. विख्यात साहित्यिक ग.दि.माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी तेथे उमटविला. आरंभी काही काळ पत्रकारी केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसे-१९४९ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी-१९५१, हस्ताचा पाऊस-१९५३, सीताराम एकनाथ-१९५१, काळी आई-१९५४, जांभळाचे दिवस-१९५७ यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी-१९५५, वावटळ-१९६४, पुढचं पाऊल-१९५०, कोवळं दिवस-१९७९, करुणाष्टक-१९८२ आणि सत्तांतर-१९८२ या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रूढ अर्थाने या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही, तर बनगरवाडी या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी व डॅनिश या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी–द व्हिलेज हॅड नो वॉल्स –डॅनिश.). वावटळ, करुणाष्टक आणि कोवळे दिवस या त्यांच्या कादंबऱ्या आत्मचरित्रपर आहेत. गांधीवधानंतर झालेल्या भीषण दंगली, लुटालूट आणि जाळपोळ यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची वावटळ ही कहाणी होय. विंड्स ऑफ फायर या नावाने तिचे इंग्रजी भाषांतर झाले आहे. करुणाष्टकात दारिद्रयाने ग्रासलेली आठ मुलांची दुःखी आई त्यांनी उभी केली. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले होते. कोवळे दिवस या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्याची चीड आणि पुढंच पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग चोखाळण्याची दलित मनाची धडपड दाखविली आहे. सत्तांतर मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घूसखोरी, त्यांचे संघर्ष नरानरांतले, माद्यामाद्यांतले सर्व वानरांची जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन या छोट्याशा कादंबरीत आहे. सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानरांच्या या कथेतून मानवी जगातील वृत्तिप्रवृत्तींचीही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो… जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरूक परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो ….. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो, ही कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत.
त्यांनी नाटकेही लिहिली- तू वेडा कुंभार, सती, पति गेले गं काठेवाडी ही त्यांतील काही विशेष उल्लेखनीय होत. कुनाचा कुनाला मेळ न्हाई आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल- कथा-१९५०, वंशाचा दिवा-कथा-१९५०, जशास तसे-कथा-१९५१, सांगत्ये ऐका-पटकथा, संवाद-१९५९, रंगपंचमी-पटकथा, संवाद-१९६१ यांचा समावेश होतो. नागझिरा-१९७९, पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे-१९७९, पांढऱ्यावर काळे-१९७१, रानमेवा-१९७८, चित्रे आणि चरित्रे-१९८३ ही त्यांची पुस्तके ललित गद्य या प्रकारातली.
रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ सन १९५५–८५पर्यंत नोकरीत होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. त्यांत गावाकडील गोष्टी, काळी आई यांसारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो. सत्तांतरला तर १९८३चे साहित्य अकादेमीचे पारितोषिक प्राप्त झाले. १९८३मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. अशा या साहित्यप्रेमी व्यंकटेश माडगूळकर यांनी दि.२८ ऑगस्ट २००१ रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला.
!! व्यंकटेश माडगूळकरांना व त्यांच्या साहित्यप्रतिभेला स्मृतिदिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन जी !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
(प्रसिद्ध लेखक व कवी)
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.