आज ५ सप्टेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांच्याच स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. १९६२ मध्ये राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याची त्यांनी सांगितले होते. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही सुरूच असून भविष्यातही सुरूच राहील.
आपल्या संस्कृतीत शिक्षकाला म्हणजे गुरूला मानाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरूंची म्हणजे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसतो तर तो जीवनाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो. भारतीय शिक्षण परंपरेत गुरू शिष्यांचा संबंध अत्यंत पवित्र मानला आहे. प्राचीन काळी गुरुकुल पध्दत होती. विद्यार्जन करण्यासाठी विद्यार्थी घरदार सोडून गुरूच्या घरी राहण्यास येत असे. गुरू हा त्या शिष्यांच्या मातापित्यांची जागा घेत असे. शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर शिष्याला चारित्र्यसंपन्न करणे हे आपले कर्तव्य आहे या विचारप्रेरणेतून गुरू विद्यादान करत असे. शिष्याच्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान असत आणि गुरूच्या जीवनातही शिष्याला सर्वोच्च प्राधान्य असे. याप्रमाणे त्याकाळी गुरू शिष्य संबंध पवित्र बंधनाने युक्त होते. आज काळ बदलला असला तरी शिक्षकांचे महत्व कमी झाले नाही. आजच्या विज्ञान युगातही पूर्वीप्रमाणेच शिक्षकांची आवश्यकता भासते. मनुष्याच्या जीवनातून शिक्षक वजा होऊच शकत नाही. जर शिक्षकच नसेल तर मनुष्याच्या जीवनाची दिशा भरकटू शकते. मनुष्याचे जीवन भरकटलेल्या नौकेसारखे होईल म्हणूनच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. केवळ आपल्याच देशात नव्हे तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, जर्मनी, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, चिली या देशातही शिक्षक दिन साजरा केला जातो मात्र तिथे हा दिवस ५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. आपल्या देशात हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. कारण याच दिवशी १८८८ साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुथानी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वेगळे वलय निर्माण केले. आंध्र विद्यापीठ आणि बनारस विश्व विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांनी भूषवले. १९३१ ते १९३९ या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत ते रशियामधील भारताचे राजदूत होते. १९५२ साली ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. या पदावर दहा वर्ष राहिल्यानंतर १९६२ साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. १९५४ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. शुद्ध चारित्र्य, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जगभर विलक्षण लोकप्रियता मिळवली म्हणूनच नोबेल पुरस्कारासाठी त्यांना तब्बल २७ वेळा नामांकन मिळाले. शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरवात केली. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५