पुरुषांना व्रत आचारण प्रणालींची ओळख! (ऋषी पंचमी व्रत विशेष.)

82

 

_ऋषी पंचमी हे हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे,भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित लेख वाचा….. संपादक._

सन १८७१-७२ची हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्त्य, क्रतु, मरीचि, अत्रि आणि वसिष्ठ या ऋषींचे पूजनही या दिवशी केले जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रितीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते, असे मानले जाते. ज्या विद्यार्थ्याना श्रावणी- वेदाध्ययन करणाऱ्या वर्गासाठी विहित व्रत संस्काराचा लाभ होत नाही, अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषिपंचमी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.
व्रताचार- कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन, पंचगव्य प्राशन, सुवासिनींना हरिद्रास्नान, भस्मस्नान, गोमय स्नान, मृत्तिकास्नान, महासंकलपयुक्त तीर्थस्नान, अर्घ्यदान, अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषी स्मरण- सप्तर्षीची पूजा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतः भिन्न आहे. कारण एरवीच्या उपासात रसाहार, फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते. परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते. तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात. प्रांतनिहाय व्रताचार- महाराष्ट्रात ग्रामीण भागात विशेषतः कोकण भागात हे व्रत महिला करतात त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात.
ऋषीची भाजी- या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळी माठ-भाजी या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.
ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी व्रत म्हणतात. ब्रह्मपुराणानुसार चारही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे. हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्रायश्चित्त म्हणून केले जाते. मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात, असे आपल्या पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ, कश्यप आणि अत्री या सप्तर्षी- सात ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी. त्यानंतर या ऋषींची विधिवत पूजा करावी. या दिवशी लोक सहसा दही आणि देव भात खातात, मीठ वापरण्यास मनाई आहे. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात, त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही.
ऋषीपंचमीची पौराणिक कथा- पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आणि एक मुलगी. ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले. पण, काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला. यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली. एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती, तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले. हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना माहिती दिली. उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की, तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती. पण, मासिक पाळीदरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती. मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषीपंचमीचे व्रतही पाळले नव्हते. त्यामुळेच तिची ही अवस्था झाली. यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली. ( ही माहिती व कथा उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आपण कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा सुद्धा देत नाही, हे मी प्रामाणिकपणे जाहीर करतो.)
!! ऋषिपंचमी व्रताच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
एकता चौक, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.