एका दिवसात गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंग व अत्याचाराचे एकूण चार गुन्हे दाखल

302

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-गंगाखेड तालुक्यात दोन व शहरात घडलेल्या एका विनयभंगाच्या गुन्हासह गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुर्णा तालुक्यातील वझुर येथे एका युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याने दि. ६ सप्टेंबर शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंग व अत्याचाराचे एकूण चार गुन्हे दखल झाले असून यातील आरोपीमध्ये दोन शिक्षकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपीतांमध्ये दोन शिक्षकांचा समावेश
असल्याने अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या आरोपींची धिंड काढण्याची मागणी जनतेतून होताना दिसते.
गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी शहरातील बस स्थानक परिसरातील लॉजवर घडलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची तसेच दि. ४ सप्टेंबर रोजी परळी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेली घटना ताजी असतानाच दि. ६ सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात २४ वर्षीय युवतीचा व १३ वर्षीय एक आणि १७ वर्षीय एका वेडसर अल्पवयीन मुलींचा विनयभंग तर १९ वर्षीय युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये नरसिंग सुदाम गायकवाड या अंदाजे ४० वर्षापेक्षा अधिक वयाच्या शिक्षकाने गंगाखेड येथे भाडेकरू म्हणून राहत असताना जानेवारी २०२४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सकाळ, सायंकाळ रनिंगला जात असलेल्या २४ वर्षीय युवतीचा पाठलाग करत तिच्या व्हॉटसपवर व्हिडिओ कॉल करून संदेश पाठवित युवतीच्या वडिलांच्या ही मोबाईलवर संदेश पाठवून लग्नाची मागणी करत विनयभंग केल्याची तक्रार दिल्याने नरसिंग सुदाम गायकवाड रा. अहमदपूर ह.मू. जिंतूर याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा तालुक्यातील वझुर येथील १९ वर्षीय युवती दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शौचास गेली असता गावातीलच मुंजा बनसोडे वय ३० वर्ष व अन्य एका अनोळखी इसमाने सदर युवतीला दुचाकीवर बसवून उसाच्या शेतात पळवून नेले व मुंजा बनसोडे याने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील कृष्णा उत्तम जाधव वय ३४ वर्ष याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वेडसर पणाचा फायदा घेत तिला बाथरूममध्ये तिचा विनयभंग केल्याची फिर्याद तिच्या आईने दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या गुन्ह्यात तालुक्यातील सुरळवाडी येथील इयत्ता ७ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान शाळेत घटक चाचणीचा पेपर सोडावीत असतांना बालाजी भंडारे रा. बोर्डा ता. गंगाखेड या शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने दि. ७ सप्टेंबर रोजीच्या पहाटे विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनराव बोडखे, सपोनि राम गित्ते, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दाखल झालेल्या या चार गुन्ह्यातील आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा ही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून अत्याचार करणाऱ्या आरोपींची पोलीसांनी धिंड काढावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.