गावंडे महाविद्यालय मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

74

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दिनांक ८ सप्टेंबर)
गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, रोटरी क्लब , इनरव्हील क्लब व राष्ट्रीय सेवा योजना गो. सी. गावंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ.आत्मारामजी गावंडे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व “Thanks Giving Day” चे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले आहे व त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर व दंत चिकित्सा शिबिर याचे आयोजन केलेले आहे.

तरी उमरखेड येथील सर्व सन्माननीय रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उमरखेड शहरातील सर्व नागरिकांना, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन वरील सर्व तपासण्या व रक्तदान करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी केले आहे.