ब्रिटीश राजवटीतील शोषणात्मक स्वरूपाचे चित्रणकर्ते! (भारतेंदु हरिश्चंद्र जयंती विशेष.)

64

 

_भारतेंदु हरिश्चंद्र हे भारतीय कवी, लेखक आणि नाटककार होते. अहवाल, प्रकाशने, प्रकाशनांच्या संपादकांना पत्रे, भाषांतरे आणि लोकांच्या मताला आकार देण्यासाठी साहित्यकृती यासारख्या नवीन माध्यमांचा वापर करून त्यांनी अनेक नाटके, जीवन रेखाटने आणि प्रवास लेखे लिहिली. भारतेंदु हरिश्चंद्र यांना हिंदी साहित्य आणि हिंदी रंगभूमीचे जनक मानले जाते. ब्रिटीश राजवटीतील शोषणात्मक स्वरूपाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या लेखनासाठी त्यांना युग चरण म्हणून गौरवण्यात आले आहे. रस या टोपणनावाने लिहिताना हरिश्चंद्रांनी लोकांच्या व्यथा दर्शविणारे विषय निवडले. उदाहरणार्थ, देशाची गरिबी, परावलंबित्व, अमानुष शोषण, मध्यमवर्गाची अशांतता आणि देशाच्या प्रगतीची नितांत गरज. निर्भय पत्रकार म्हणून ओळखले जाणारे हरिश्चंद्र यांनी तत्कालीन प्रचलित रूढीवादाचे खंडन केले आणि महंत, पांडे आणि पुजारी यांचा डाव उघड केला. ते एक प्रभावी हिंदू पारंपारिक होते, सुसंगत हिंदू धर्माची व्याख्या करण्यासाठी वैष्णव भक्तीवाद वापरत होते. हा ज्ञानवर्धक व माहितीपूर्ण संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी खास वाचकांच्या सेवेत समर्पित केला आहे…. संपादक._

भारतेंदु हरिश्चंद्र हे आधुनिक हिंदी साहित्याचे जनक हरिश्चंद्र यांचा जन्म दि.९ सप्टेंबर १८५० रोजी सेठ अमीनमचंद यांच्या प्रतिष्ठित घराण्यात बनारस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपालचंद उर्फ गिरिधरदास होते. भारतेंदु ही पदवी १८८०मध्ये पंडित रघुनाथ, पंडित सुधाकर द्विवेदी, पंडित रामचंद्रदत्त व्यास इ.हिंदी विद्वानांनी हरिश्चंद्रांना दिली. तेव्हापासून त्यांना “भारतेंदु हरिश्चंद्र” असे गौरवाने म्हटले जाते. भारतेंदूंच्या बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी शाळेत जाऊन पद्धतशीर शिक्षण फारच थोडे घेतले, कारण स्वभाव हट्टी व चंचल होता परंतु बुद्धी व स्मरणशक्ती फारच चांगली होती व लेखनवाचनाकडे लहानपणापासून ओढा होता. त्यामुळे बंगाली, पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, मराठी, गुजराती, इंग्रजी इ. भाषांचे शिक्षण त्यांनी घरच्याघरी घेतले. तेराव्या वर्षीच विवाह झाला व तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्यांनी उत्तर भारताचा पुष्कळ प्रवास केला. या प्रवासात विविध भाषांचा व त्यांच्या साहित्यातील प्रागतिक चळवळीचा त्यांना जवळून परिचय झाला. त्यांच्या मनावर तिचा मोठा प्रभाव पडला. हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. ते स्वभावाने मनमिळाऊ, उदार विद्याप्रेमी, रसिक व दानशूर होते. ते चांगले संघटनाकुशल व दूरदृष्टी असलेले पुरोगामी विचारांचे साहित्यिक होते. स्वाभाविकच त्यांच्याभोवती अनेक साहित्यप्रेमी व रसिक जमले. भारतेंदूंच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या साहित्यिकांनी आणि रसिकांनी विविध प्रकारची साहित्यिक व सांस्कृतिक कामगिरी केली. त्यांनी खालील प्रसिद्ध ओळी देखील लिहिल्या, ज्या वारंवार उद्धृत केल्या जातात, जेव्हा कोणीतरी दयनीय परिस्थितीबद्दल शोक व्यक्त करते ज्यामध्ये भारत अनेकदा स्वतः सापडतो. या ओळी सर्व भारतीयांना ही परिस्थिती संपवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करतात-
“रोवहु सब मिलि के आवहु भारत भाई |
हा, हा, भारत दुर्दशा न देखी जाई ||”
भारतेंदूंनी स्वतः अनेक प्रकारची साहित्यनिर्मिती केली. त्यांनी हिंदी नाट्य-वाङ्‍मयाला नवे स्वरूप प्राप्त करून दिले. सामाजिक,पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. पाखंड विडंबन-१८७२ व वैदिकी हिंसा हिंसा न भवति-१८७३ या नाटकांत धार्मिक व सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रहार केले आहेत. विषस्यविषमौषधम्‌-१८७६ या नाटकात देशी संस्थानिकांच्या गुलामी वृत्तीचे व पतित अवस्थेचे चित्रण केले आहे. श्रीचंद्रावली-१८७६ नाटिकेमध्ये प्रेम आणि भक्ती यांचे आदर्शरूप दर्शविले आहे. भारतदुर्दशा-१८८० मध्ये इंग्रजांमुळे भारताची झालेली दुःस्थिती त्यांनी दाखविली आहे. याशिवाय सत्य हरिश्चंद्र-१८७५, नीलदेवी-१८८१- गीतात्मक रूपक, अंधेर नगरी-१८८१- प्रहसन ही त्यांची स्वतंत्र नाटके आहेत. त्यांच्या नाटकांची गद्यभाषा खडी बोली असून पद्य ब्रज भाषेत आहे. भारतीय व पाश्चात्त्य नाट्यपरंपरांचा संगम त्यांच्या नाटकांत आढळतो. त्यांनी अनेक नाटके रूपांतरित केली आहेत. नाटक या शीर्षकाचा एक गंभीर व विचार परिप्‍लुत निबंधही त्यांनी लिहिला आहे. भारतेंदूंचा नाटक हा विषय आवडीचा असल्याचे प्रमुख कारण ते स्वतः नाटककार होते हे तर खरेच पण त्याशिवाय नाटक हे जनतेशी संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम आहे हेही होय. भारततेंदूंना लोकसंग्रह व लोकजागृतीची ओढ होती. त्यावेळी पारसी थिएटरने जनमनावर छाप टाकली होती. हीन अभिरूचीला उत्तेजित करून अर्थार्जन करणाऱ्या या प्रवृत्तीशी सामना करण्याच्या हेतूने भारतेंदुंनी स्वतः नाटकमंडळी स्थापना केली, उत्तमोत्तम नाटके अनुवादित केली व करवली आणि स्वतः कधी कधी नाटकांत काम करून नाट्यव्यवसायाला प्रतिष्ठाही मिळवून दिली.
“निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल |
बिन निज भाषा-ज्ञान के, मिट न हिय को सूल ||”
भाषांतर- प्रगती ही स्वतःच्या भाषेत (मातृभाषा) केली जाते, कारण ती सर्व प्रगतीचा पाया आहे.
मातृभाषेच्या ज्ञानाशिवाय हृदयाच्या वेदनांवर इलाज नाही.
भारतेंदूंनी कवी म्हणूनही मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या सु. ६९ लहानमोठ्या कविता उपलब्ध आहेत. यांत अनुवादित कविताही आहेत. त्यांनी शृंगार, भक्ती, दिव्य प्रेम यांसंबंधी कविता लिहिल्याच पण राजभक्ती, देशभक्ती, भावोन्नती आणि समाजसुधारणांसंबंधीही कविता लिहिल्या. त्यांच्या काव्यात परंपरागत काव्यप्रवृत्तींबरोबरच नवीन युगाला अनुरूप अशी कविता आहे. जुन्या वृत्तांबरोबरच नव्या वृत्तांचाही वापर त्यांनी केला. व्यंग्य व हास्यप्रचुर काव्यही त्यांनी लिहिले. त्या काळी त्यांची शृंगारपर रचना जनतेच्या जिभेवर खेळत होती. त्यांनी पुष्कळशी कविता ब्रज भाषेतच लिहिली. खडी बोलीत कविता लिहिण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यांचा खडी बोलीतील कवितेचा संग्रह फुलों का गुच्छा-१८८२ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काही महत्त्वाचे काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे- प्रेम मालिका-१८७१, प्रेम माधुरी-१८७५, प्रेम प्रलाप-१८७७, प्रेम फुलवारी-१८८३ इत्यादी.
भारतेंदू चांगले निबंधकार व पत्रकार होते. हरिश्चंद्र मॅगेजिन, कवि वचनसुधा, बाला बोधिनी, हरिश्चंद्र चंद्रिका या त्यांनी संपादित केलेल्या नियतकालिकांतून त्यांचे निबंध, टिपणे प्रकाशित होत असत. या निबंधांतून त्यांची समाजोन्नतीची प्रचंड तळमळ सामाजिक, धार्मिक आणि राजकीय घडामोडींविषयीची जागरूकता स्वदेश, स्वभाषा व समाज यांच्याबद्दलचा अभिमान दिसून येतो. प्रारंभी त्यांच्या मनात राजभक्ती होती परंतु दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या राजकीय परिस्थितीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन ही राजभक्ती राष्ट्रीय अस्मितेत परिवर्तित झाली. त्यांची भाषा विषयास साजेसे रूप धारण करीत असे. व्यंग, विनोद, उपहास, उपरोध यांनी युक्त अशी प्रसादपूर्ण भाषा ते सामान्यतः वापरीत. प्रसंगी गंभीर, प्रौढ व विचारपरिप्‍लुत भाषेचाही ते वापर करीत. ते पुढे म्हणतात-
“विविध कला शिक्षण अमित, ज्ञान अनेक प्रकार |
सब देसन से लै करहू, भाषा माही प्रचार ||”
अर्थ- अनेक कला आणि शिक्षण अनंत, विविध प्रकारचे ज्ञान असते. ते सर्व देशांतून घेतले पाहिजे, परंतु मातृभाषेतून प्रचार केला पाहिजे.
भारतेंदूंनी युगप्रवर्तक लेखकाचे काम यशस्वीपणे केले. धार्मिक व शृंगारिक परंपराधिष्ठित काव्यात देशप्रेम, समाजस्थिती, सुधारणा, राजकीय परिस्थितीवर उपहास इ.विषय आणून हिंदी काव्याला आधुनिक बनविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. भारतीय नाट्यपरंपरांनी जखडलेल्या नाट्य-साहित्यात पाश्चात्त्य नाट्याचे युगानुरूप विशेष समाविष्ट करून नाटकाला त्यांनी काळाला साजेसे रूप दिले. भारतीय संस्कृती, हिंदु धर्म, सामाजिक परंपरा यांच्याबद्दलचा रास्त अभिमान बाळगून नव्या अधुनिक मूल्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केला. मध्य युग व आधुनिक युग यांच्या संधिकालात दोन भिन्न जीवनदृष्टी आणि मूल्यविचारांत संघर्ष येऊ न देता कल्याणकारक समन्वय करण्याचा त्यांचा प्रयत्‍न त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतो. हिंदी गद्याला (खडी बोली) अधिक व्यवस्थित, शुद्ध व शक्तिशाली बनविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. जनसंपर्काची साहित्यिक साधने- नाटक, नियतकालिक वापरून जनजागृतीचाही त्यांनी प्रयत्‍न केला. हे सर्व त्यांनी आपल्या मृदू, ऋजू आणि शालीन व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने केले आणि म्हणूनच त्यांच्या अवतीभोवती तत्कालीन समाजहितेच्छू विद्वानांचा व ध्येयवादी पत्रकारांचा समुदाय गोळा झाला. या समुदायालाच भारतेंदु मंडळ म्हणतात. या मंडळातील बालकृष्ण भट्ट, बदरीनारायण चौधरी-‘प्रेमघन’, प्रतापनारायण मिश्र, राधाचरण गोस्वामी, लाला श्रीनिवास दास, अंबिकादत्त व्यास, बाल मुकुंद गुप्त, ठाकूर, जगमोहनसिंह इ. लेखक-पत्रकारांनी भारतेंदुंनंतरही त्यांचे कार्य सतत चालू ठेवले. म्हणून १८५०-१९०० हा काळ भारतेंदु काळ म्हणून हिंदी साहित्यात ओळखला जातो. त्यांना पद्याची व गद्याची भाषा एक (खडी बोली) असावी, हे मनोमन मान्य होते परंतु खडी बोलीत पद्यरचना करण्याचे त्यांचे प्रयत्‍न फारसे फलदायी ठरले नाहीत, ही त्यांच्या कार्याची एक सीमा म्हणावी लागेल. अखेर अवघ्या वयाच्या ३४व्या वर्षी ऐन तारुण्यात बनारस येथे ते दि.६ जानेवारी १८८५ रोजी निधन पावले.
!! भारतॅदु हरिश्चंद्र यांना त्यांच्या पावन जयंती पर्वावर अनंत कोटी विनम्र अभिवादन जी !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
एकता चौक, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.