आपले सरकार पोर्टल 2.0’ बाबत अधिका-यांचे प्रशिक्षण नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना

72
Advertisements

 

उपक्षम रामटेके, सह संपादक मो. 98909 40507

चंद्रपूर, दि. 12 : नागरिकांना त्यांच्या तक्रारी घेऊन शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, तसेच त्यांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा, या उद्देशाने शासनाने ‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 2.0’ उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलचे महत्व, उद्देश, गांभिर्य, शासकीय विभागाची जबाबदारी आदी बाबी अवगत होण्यासाठी मुंबई येथून आलेल्या टीममार्फत गुरुवारी नियोजन भवन येथे जिल्ह्यातील अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्राला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह मुंबईवरून आलेले ई- गव्हर्नन्स एक्सपर्ट देवांग देव, टेक्निकल एक्सपर्ट शुभम पै, आपले सरकार पोर्टलचे तांत्रिक सहायक विनोद वर्मा आणि हर्षल मंत्री उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी हे अतिशय महत्वाचे पोर्टल आहे. सर्व अधिकारी – कर्मचा-यांना या पोर्टलची माहिती व्हावी, डीजीटल प्लॅटफॉर्म, ई-गव्हर्नन्सनुसार काम झाले पाहिजे, हा या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे. सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना याबाबत अवगत करावे. तसेच नागरिकांच्या आलेल्या तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
‘आपले सरकार पोर्टल 2.0’ बाबत अधिका-यांना प्रशिक्षण देतांना देवांग देव म्हणाले, कोणत्याही विभागाबाबतची तक्रार एकाच प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा या पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. केवळ राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारच्या विभागाशी संबंधित तक्रार सुध्दा येथे नागरिकांना करता येणार आहे. पारदर्शकता, गतिमानता, जबाबदारी आणि लोकांचा विश्वास या चार बाबींवर आधारीत सदर पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे.
नागरिकांची आलेली तक्रार 21 दिवसांत निकाली काढण्याचे बंधनकारक आहे. जर 21 दिवसांत काहीच झाले नाही तर त्यांची माहिती संबंधित तक्रारकर्त्याला कळणार असून तक्रारदार वरिष्ठांकडे जाऊ शकतो. शासकीय अधिकारी किंवा विभागाला यात कोणतीही पळवाट काढता येणार नाही. त्यामुळे आपल्याशी संबंधित तक्रारीवर योग्य आणि वेळेत निर्णय घ्यावा. या पोर्टलमध्ये जास्तीत जास्त 3 हजार शब्दांपर्यंत तक्रार नोंदविता येते. आलेल्या तक्रारींचा सकारात्मक पध्दतीने निपटारा व्हावा. शासन स्तरावरून दरमहिन्याला याचा आढावा होत असतो, असे श्री. देव यांनी सांगितले.
प्रशिक्षणाला सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.