आधुनिक भारताचे शिल्पकार : सर विश्वेश्वरय्या

34

 

 

प्रविण बागडे, नागपूर
​​​​​​​भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com

 

 

 

 

​​
​​​काही माणसे जन्मत: मोठे गुण घेऊन जन्माला येतात, पंरतू या जन्मजात गुणवत्तेला प्रयत्नांची कास असावी लागते. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या पैकीच एक, ज्यांनी प्रखर बुध्दिमत्तेच्या बळावर अखंड वाचन, चिंतन, मनन व संशोधन याची जोड दिली व आभाळा एवढे काम आपल्या आयुष्यात उभे केले, त्याला तोड नाही.
​​​विश्वेश्वरय्या लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले त्यावेळी त्याचे वय फक्त 14 वर्षाचे होते. काकांकडे राहत असतांना बंगळूर येथे सेंट्रल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला सोबतच शिकवण्या घेत आपले शिक्षण पूर्ण करायला सुरवात केली. वर्गात श्रवण, चालता चालता चिंतन, घरात वाचन असा दिनक्रम सुरु ठेवला आणि 1880 मध्ये ते बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. भाषा, ध्येय, चिकाटी सर्वांच्याच प्रेरणा सकारात्मक ठेवून एक मुलगा इतकी उत्तुंग झेप घेऊ शकतो विश्वास बसत नाही, असं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व सरांचं होतं. काय किमया केली त्यांनी थक्क करणारा प्रवास होता जो जिद्दीच्या भरवशावर केला. अलौकिक असा !
​​​दुर्दम्य आत्मविश्वास व ईच्छाशक्ति आणि जिवापाड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती, म्हणुन कर्नाटकच्या या हुशार विद्यार्थ्याला म्हैसूर सरकारने शिष्यवृत्ती देऊन त्याला प्रोत्साहित केले. विज्ञान विषयाची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी पुण्यात विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. स्थापत्य शास्त्रामध्ये ते 1883 मध्ये मुंबई, गुजरात, कर्नाटक या तिन्ही राज्यांतून पहिले आले. तेव्हा मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करावी लागली. ऐकुनच त्यांना कामाची चालना मिळाली. भारतीय पाटबंधारे महामंडळाकडुन निमंत्रण आले. लगेच त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर रुजू व्हावे लागले. त्या काळात धुळया पासून सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या अनेक विधपूर नियंत्रण व पाटबंधारे योजनांची आखणी व उभारणी त्यांनी केली. यामध्ये साताराच्या वीरधरणाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. इतकी भरभक्कम अफलातून कामगीरी त्यांनी केली.
​​​कोणत्याही धरणाची उंची मर्यादित ठेवून जास्तीत जास्त पाणी साठा करणारी व धरणाच्या भिंतीला धोका निर्माण न होता, आपोआप उघडणाऱ्या कळसूत्री दरवाजांची कल्पना शोधून काढली व त्याचे प्रात्याक्षिक म्हणून पुण्याच्या खडकवासला धरणावर 1903 मध्ये ती कल्पना अमलांत आणली. पुढे अशाच प्रकारच्या दरवाजांची यंत्रणा म्हैसूर येथील कृष्णराज सागर धरणावर बसवून एक विक्रमच त्यांनी केला. त्यामुळे सर विश्वेश्वरय्या यांना म्हैसूर राज्याचा पिता म्हणुन ओळखल्या जाऊ लागले. कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधले ते आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. याचे श्रेय त्यांच्या नावाला दिले जाते, कर्ता-करवीता म्हणायला हरकत नाहीच. इतकी भरीव कामगीरी एका अभियंत्यांने केली, भुषणावह बाब आहे. त्यामुळेच तेथील सरकारने त्याचे पेटंट देखील सर विश्वेश्वरय्या यांच्या नावावरच केले. 1904 मध्ये शेतीच्या पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचे पाणी गावात शिरण्याची भीती एकदा निर्माण झाली, ती थोपवण्याचे काम मोठया सचोटीने त्यांनी केले. सरकारी नोकरीत असतांना सरांनी असामान्य असे कर्तृत्व दाखवले. परंतू एक भारतीय असल्यामुळे इंग्रज त्यांना ‘मुख्य अभियंता’ हे पद देण्यास तयार नव्हते. त्यामुळे 1907 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी स्वेच्छानिवृत्ती पत्करणाऱ्यांना पेन्शन मिळत नसे. परंतू सरांच्या बाबतीत मुंबई सरकारने अपवाद केला व सेवानिवृत्ती वेतन मिळावे, अशी व्यवस्था केली.
​​​हैदराबाद हे त्याकाळात पुढारलेले निजामाचे संस्थान म्हणून ओळखले जात होते. या शहरामधून दोन मोठया नद्या वाहत होत्या. ईसा व मुसा पाऊस काळात प्रचंड थैमान घालणाऱ्या नद्यांमुळे अवघ्या राज्यावर संकट ओढावले होते. निजामाने सर एस.व्ही. ना तातडीने व प्रार्थनापूर्वक पाचारण केले. सहा ते सात महिन्यांत त्यांनी या दोन नद्यांना एकत्र करुन या नद्यांवर दोन भक्कम धरणे बांधली. त्यामुळे हैद्राबाद शहराला वेगळे रुप आले. या योजनेचे काम चालू असताना मध्येच एक गोष्ट घडली. कर्नाटकच्या म्हैसूर संस्थानच्या राजांनी सरांना आपल्या सेवेची व अनुभवाची संस्थानला खूप गरज आहे, असे आग्रहाचे निमंत्रण पाठवले. आपल्याला कर्नाटकाची सेवा करायला मिळणार. या द्विगुणीत आनंदाच्या भरात सर ताबडतोब म्हैसुरला आले. तेव्हा तेथील सरकारने म्हैसूर राज्याचे त्यांना प्रमुख अभियंता व सल्लागार पद देऊन सन्मानित करण्यात आले.
​​​म्हैसूर पासून काही मैलांवर जगविख्यात कृष्णराज सागर नावाचे अजस्त्र धरण आहे. ते पूर्ण करण्याचे सर्व श्रेय सरांना जाते आठ हजार 600 फूट लांबी, 111 फूटी रुंदी, 140 फूट उंची असणाऱ्या धरणाच्या बाजूला 60 मैल लांबीचा कालवा आहे. या धरणातून ठरविक प्रमाणात पाणी शिव समुद्रम धबधब्यात पडते व त्यावर चालवले जाते विराट विद्युत केंद्र. अफाट बुध्दिमत्ता लाभलेल्या सरांना म्हैसूरच्या राजाने दिवाण केले. म्हैसूरचे चंदनाचे तेल व साबण त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले. इटली व जपानमधून तज्ज्ञ बोलावून रेशीम निर्मितीच्या कामास गती दिली. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. भद्रावतीचा पोलाद कारखाना उभा केला. सिमेंट, कागद, आग पेट्यांचे उत्पादन वाढवले. स्वत:च्या कामासाठी कधीच संस्थानची गाडी व कागद वापरला नाही. मानधनाच्या रकमेतून तांत्रिक शिक्षण संस्था सुरु केल्या, आजही त्या कार्यरत आहेत.
​त्यांच्या म्हैसूर राज्याचे नोकरी दरम्यान त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखाली म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अग्रणी औद्योगिक प्रकल्प सुरू केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्ते बांधणीतही त्यांनी योगदान केले. 1908 मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन 1917 मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारताची पहिली अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.
​सर विश्वेश्वरय्या यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन 1923 च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. सर विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानाप्रित्यर्थ निघालेल्या संस्था आजही डौलाने उभ्या असुन कार्यरत आहेत. हीच एका अभियंत्याची मिळकत आहे.
​​​याच बरोबर सरांनी पुणे, हैदराबाद, म्हैसूर या शहरांसाठी भुयारी गटार योजना राबवली. नवी दिल्ली राजधानी बनवावी का ? या प्रश्नावरील समितीचे अध्यक्षही सर होते. राई पासुन पर्वता एवढे काम उभे करणाऱ्या सरांना सन 1955 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते 94 वर्षांचे होते. सध्याच्या युगात यावर्षी बांधलेला रस्ता किंवा पूल पुढच्या पावसाळयात आम्ही वाहून गेलेला पाहतो, गावामध्ये बांधलेला बंधारा गळकी चाळण झालेला दिसतो. आज सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी करीत असतांना त्यांच्या सारखा कर्तबगार सामाजिक अभियंता आमच्या देशाला मिळावा, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. तेव्हापासुनच देश पातळीवर सर विश्वेश्वरय्या नांवानेच ‘अभियंता दिवस’ पाळण्यात येतो. भरीव अशा अथक प्रयत्न करणाऱ्या अभियंत्यास मानाचा मुजरा !