खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्णपदके-तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न

146

 

जळगाव =दि.१८सप्टेंबर) (प्रतिनिधी) – तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली. तायक्वांदो हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा शासकीय स्पर्धांसोबतच आता “अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग” मध्येही तायक्वांदो खेळाचा मागील दोन वर्षीपासून समावेश झाला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या अधिकृत राष्ट्रीय संघटनेकडे या ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी शासनाकडून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेहमीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र संघातील मुलींनी खेलो इंडिया वुमन्स स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये साक्षी पाटील, श्रुतिका टकले व नयन बारगजे यांनी तीन सुवर्णपदके पटकावली. ज्युनिअर गटात सिद्धी बेंडाळे ,श्रद्धा वाळकेरकर यांनी दोन सुवर्ण तर कॅडेट गटात कार्तिकी मिसाळ, त्रिषा मयेकर, रिया मयेकर यांनी तीन सुवर्णपदके जिंकली. जुनिअर वैयक्तिक गटात साईनी रावत व सिनिअर वैयक्तिक गटात वसुंधरा चेढे यांनी पुमसे प्रकारामध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. १० खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत प्रवीण सोनकुल (पुणे) यांनी महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले. खेलो इंडिया स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घारगे, सतीश खेमस्कर आदींनी कौतूक केले आहे.