विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या घटनेतील दोषींना सुट्टी नाही – अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप

111
Advertisements

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक १९ सप्टेंबर) सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी समाजकंटकांनी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ढाणकी व विडूळ येथे दगडफेकीच्या अप्रिय घटना घडवून आणल्या त्याबाबत तांत्रिक बाबींची पडताळणी झाली असून लवकरच घटनेतील दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल व कोणत्याही निर्दोष व्यक्तीला त्रास दिला जाणार नाही.

यापुढे असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी येत्या सात दिवसात धाडसी निर्णय घेऊन समाजकंटकांचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ढाणकी येथे दि.१७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या व मुर्ती विटंबनेच्या घटनेला अनुसरून काही प्रवृत्तींनी खोडसाळपणे समाज माध्यमावर चुकीची व्हिडिओ क्लिप प्रसारित करून पोलिसांच्या कार्य कर्तृत्व वर बोट ठेवून अफवा पसरून सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडिओ क्लिप मध्ये कुठलेही तथ्य नसून समाज माध्यमावर जाणीवपूर्वक क्लिप प्रसारित केली.

याबाबत तांत्रिक बाबी पडताळण्यात आल्या असून चुकीच्या अफवा पसरणाऱ्याविरुद्ध पोलीसांकडून सुमोटू कार्यवाही करणार असून त्यानंतर दि.१७ ढाणकी येथील घटनेतील आरोपींविरुद्ध पोलिसांनी पारदर्शकपणे कार्यवाही केली आहे.

तसेच १८ सप्टेंबर रोजी विडूळ येथेही विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या याबाबत कुठलीही तक्रार नसताना पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले व नंतर त्यांना सोडून दिले.
लोकउत्सवाला पोलिसांचे सहकार्यच आहे. घडलेल्या दुर्दैवी घटना कोणालाही आनंद देणाऱ्या नाही परंतु रिकामी डोकी आपले उखळ पांढरे करण्यासाठी समाज माध्यमावर चुकीच्या व्हिडिओ क्लिप प्रसारित करीत असल्याचे उघड झाले आहे .त्यानंतर दि १८ चे रात्री शहरात दुकान जळाल्याची घटना घडली.

याबाबत अज्ञाता विरुद्ध आलेल्या तक्रारीनुसार लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळणार असल्याचे त्यांनी म्हटले. सज्जनांचे संरक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे.
त्यामुळे निरापराधांवर कुठलीही कार्यवाही होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग घेत आहेत.

या घटनेतील दोषींना आता सुट्टी नाही असा सज्जड इशारा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी दिला आहे.

उमरखेड शहरातील विसर्जन मिरवणूक सर्वांच्या सहकाऱ्यांनी शांततेत पार पडली याबद्दल त्यांनी शांतताप्रिय नागरिकांचे आभार मानले.

दिनांक१६,१७,१८,१९ या ७२ तासांच्या कालावधीत पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड तणाव होता .घटनेच्या बाबी तपासल्या जात आहे .काही तांत्रिक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून येत्या ७ दिवसात समाजकंटकावर कार्यवाही करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात येणार असल्याचेही अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकपियुष जगताप यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले .गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने उमरखेड शहरातील ईद-ए-मिलादची मिरवणूक दिनांक २८ सप्टेंबर रोजी काढण्याबाबत आयोजकांनी पोलिसांची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
पत्रकार परिषदेला ठाणेदार संजय सोळंके हे हजर होते.