फलटण – श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी ‘हिंदी दिवस समारोह’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला वेणुताई चव्हाण कॉलेज कराडचे हिंदी विभाग अध्यक्ष प्रो. डॉ. दिपक जाधव प्रमुख अतिथी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया फलटणचे शाखा अधिकारी मा. श्री. राजेंद्र कांबळे विशेष उपस्थिती म्हणून लाभले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. यानंतर हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाचा उद्देश व हिंदी विभागाचा आढावा घेतला. यानंतर प्राचार्य उदय जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा पर्यावरण अनुकूल फळ वृक्षरोप व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रो. डॉ. दिपक जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदी भाषेचा इतिहास, स्वतंत्रता आंदोलनामध्ये हिंदी भाषेचे योगदान, भाषिक एकता, त्रिभाषा सूत्र, भाषा विकास के उपाय, हिंदी भाषेची वैश्विकता, रोजगार परकता, व्यावहारिक उपयोग इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले की, “आज जागतिकीकरणाच्या युगात हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही. आपण आपल्या मातृभाषेमध्येच ज्ञान योग्य प्रकारे ग्रहण करू शकतो आणि म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा, संपर्क भाषा, राष्ट्रीय भाषा यांना अत्याधिक महत्त्व देण्यात आले आहे. आपण हिंदी भाषेचा सन्मान करून राष्ट्रीय कर्तव्याची पूर्ती केली पाहिजे. हिंदी ही स्वभाषा, एकात्मता, संस्कृती, राष्ट्रीयता व सन्मानाचे प्रतीक आहे. देशाला महासत्ताक बनवण्यामध्ये हिंदी भाषेचे योगदान अमूल्य असेल. भाषा मनुष्याचा सर्वांगीण विकास करते. भाषेच्या माध्यमातून इतर ज्ञान शाखा अभ्यासता येतात. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये भाषा सर्वात मोठी क्रांती होय. भाषेमुळे माणसाचे जगणे समृद्ध झाले आहे. आज आपण भाषेशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हिंदी भाषा केवळ एशिया पुरती मर्यादित राहिली नसून वरील सर्व सोपस्कार पूर्ण करून ती जागतिक भाषेच्या दृष्टीने अग्रेसर होत आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ युनोच्या सर्व सदस्यांनी एकमताने हिंदी भाषेला विश्व भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण 10 जानेवारी हा दिवस ‘विश्व हिंदी दिवस’ भाषा म्हणून साजरा करतो. भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.’
यानंतर कार्यक्रमाची विशेष उपस्थिती मा. श्री. राजेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या व मौलिक मार्गदर्शन केले.
राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून ‘हिंदी प्रबोधन सप्ताह’ च्या अनुषंगाने हिंदी विभाग व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या दरम्यान. रांगोळी, पोस्टर, निबंध, वक्तृत्व, गीत गायन अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी सेंट्रल बँके चे भाषा विकास व सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून आर्थिक सहाय्य लाभले. या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सेंट्रल बँकेच्या वतीने ट्रॉफी व महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी च्या यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व सौ. वेणुताई चव्हाण फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले. रांगोळी स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, स्नेहा बनकर, साक्षी भगत, ऐश्वर्या कदम, केतकी गायकवाड, पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, केतकी गायकवाड, स्नेहा बनकर, गौरी नामदास, प्रियांका ठोंबरे, निबंध स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, केतकी गायकवाड, प्रगती सकट, श्रद्धा पाटोळे व सानिया कुरेशी, वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश बापू नामदास, प्रिया लंभाते, अंकिता भिसे, गीत गायन स्पर्धेमध्ये यश बापू नामदास, आरती कणसे, अंकिता भिसे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विविध स्पर्धेमध्ये सहभागी चार शाखांपैकी सौ. वेणुताई चव्हाण डी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप मिळवली.
यानंतर प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून भाषेची व्यवहारिक उपयोगिता व जीवनामध्ये भाषेद्वारे कसा समतोल साधला जातो याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व व कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन अग्रणीय महाविद्यालय अंतर्गत व हिंदी विभाग याद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले तर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा. श्री. विठ्ठल गौंड यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित राहून प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाप्रकारे ‘हिंदी दिवस समारोह’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.