स्वच्छतेतून सामाजिक व मानसिक आरोग्य सुधारते – संतोष पवार, स.पो.नी.धरणगाव

40

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा “स्वच्छता ही सेवा” पंधरवडा म्हणून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव तर्फे दिनांक २२ सप्टेंबर रोजी धरणगाव शहरातील पोलीस स्टेशन, बस स्टॅन्ड, शिवाजी पुतळा चौक व ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी प्रति विद्यार्थी दीड किलो प्लास्टिक गोळा करून धरणगाव नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय शिंगाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, एडवोकेट प्राध्यापक प्रशांत क्षत्रिय हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी स्वयंसेवकांनी प्रभात फेरीद्वारे स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.
पो.नी. संतोष पवार साहेबांनी धरणगाव शहरातील विविध ठिकाणची स्वच्छता केल्याबद्दल विद्यार्थी स्वयंसेवकाना शुभेच्छा दिल्या व असेच सामाजिक कार्य करत जाऊन त्यामधून आपली उन्नती करून घ्यावी असे मत व्यक्त केले. याप्रसंगी स्वच्छता ही आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या शेजारील परिसरासाठी कशी आवश्यक आहे हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन त्याचे महत्त्व उपस्थित स्वयंसेवकांना करून दिले. तसेच स्वच्छतेतूनच सामाजिक व मानसिक आरोग्य सुधारते असे प्रतिपादन केले. अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ. संजय शिंगाणे यांनी भारताला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी स्वच्छता ही सेवा हा उपक्रम खूप आवश्यक आहे , यातूनच एक दिवस आपला देश समृद्ध होईल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा.डॉ.गौरव महाजन यांनी विद्यार्थी स्वयंसेवकांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. ज्योती महाजन, प्रस्तावना डॉ.अभिजीत जोशी तर आभार प्रा.योगेश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.