▪️श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे दोनदिवसीय ॲक्युप्रेशर थेरेपी शिबिर संपन्न ▪️आरोग्य दिनचर्यामध्ये ॲक्युप्रेशर थेरेपी, नॅचरोपॅथी व योगाचे अनन्यसाधारण महत्त्व; डॉ. सोनगिरकर

17

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व ॲक्युप्रेशर थेरेपी तज्ञ, सुप्रसिद्ध डॉ. अविनाश सोनगिरकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.जैन मंदिर येथे दोन दिवसीय ॲक्युप्रेशर, वायब्रेशन व नेचरल थेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी दीपप्रज्वलन डॉ.अविनाश सोनगिरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंद डहाळे, कमलेश तिवारी, डॉ.कुलकर्णी, मुकेश बयस, राजेंद्र वाघ, ललित उपासनी आदी मान्यवरांसह श्री.आ.दि जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राहुल जैन, उपाध्यक्ष प्रतिक जैन, सचिव श्रेयांस जैन, निकेत जैन उपस्थित होते.
या शिबिरात जवळपास शंभरहून अधिक रुग्णांवर शारीरिक उपचार करण्यात आले. उपचारासाठी आलेले रुग्ण हे बऱ्याच वर्षांपासून शारीरिक आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी थेरेपी घेतल्याने बऱ्यापैकी फरक झाल्याचा अभिप्राय नोंदविला व चेहऱ्यावर समाधान झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी डॉ. सोनगिरकर म्हणाले की, पृथ्वीतलावरचा प्रत्येक मानव हा सध्याचा धावपळीच्या जीवनात व्यस्त असल्याने त्याचे शरीरावर दुर्लक्ष झाले आहे. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या दिनचर्येत थेरेपी, व्यायाम, योगा करणे गरजेचे आहे. वेदना आणि तणाव कमी करण्यापासून ते भावनिक संतुलन सुधरण्यापर्यंत यांसह एकूणच आरोग्याला चालना देण्यापर्यंत, ॲक्यूप्रेशर थेरेपी काम करते. जगभरातील लोकं ॲक्यूप्रेशर थेरपीने उपचार करताहेत. ॲक्युप्रेशर चिकित्सा शरीर आणि मन ह्या दोघांनाही शक्ती प्रदान करते. यामुळे अनेक समस्यांपासून आराम देखील मिळतो. असेही डॉ. अविनाश सोनगिरकर यांनी सांगितले. सदरील शिबिरात प्रामुख्याने मान, कंबर, हात, गुडघे, संधिवात, सायटिका, अर्धांगवायू, मायग्रेन यांसह विविध आजारांवर उपचार करण्यात आले. थेरेपी शिबिर दरम्यान बाळासाहेब चौधरी, संजय महाजन, डी एस पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, दिनेश पाटील आदींनी भेटी दिल्यात. आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह प्रफुल्ल जैन, सुयश डहाळे, विनोद जैन, सुप्रीत डहाळे, मयंक जैन, विलास जैन आणि सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.