विद्यार्थ्यांनी मराठी भाषेकडे करिअर म्हणून बघावे -प्रा.डॉ.शिवाजी हुसे

61

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘तिफणकार’ तसेच मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र प्रमुख, शिवाजी महाविद्यालय, कन्नड येथील साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे ‘मराठी भाषा कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शिवाजी हुसे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी तसेच सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. एन.सोनवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेतील अनेक कौशल्ये संपादन करून व्यक्तिमत्व विकास घडवायला हवा.कारण या कौशल्ये विकासातूनच अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये आत्मसात केल्यास मराठी भाषा विषय घेऊनही करिअर करता येईल. या अनुषंगानेच विविध क्षेत्रातील मराठी उपलब्ध असणाऱ्या संधींची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’
याप्रसंगी ‘मराठी भाषा कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.शिवाजी हुसे म्हणाले की, ‘कौशल्य विकासासाठी जिद्द व मेहनत हवी. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम भाषा विभाग करतो.स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावी त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. मराठी भाषा विषयाकडे करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी बघावे’. यावेळी त्यांनी मराठी भाषा घेऊन करिअर कसे करता येईल, याविषयी मार्गदर्शन करतांना जाहिरात क्षेत्र, चित्रपट पटकथा लेखन क्षेत्र, स्क्रिप्ट रायटर, वृत्तपत्रे, नियतकालिके, संपादन क्षेत्र, प्रकाशन संस्था, प्रकाशन व्यवहार, मुद्रित शोधक, व्हिडिओ एडिटिंग, कन्टेन्ट रायटर, सूत्रसंचालक, वक्ता, संपादक, संशोधक व अभ्यासक अशा अनेक क्षेत्रातील उपलब्ध संधींची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश सोनवणे व शुभांगी पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.