आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासी समाजाचा उमरखेड येथे मोर्चा (माहेश्वरी चौकात केले रास्ता रोको आंदोलन)

88

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :-(दि.४ आँक्टोबर) तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने,आदिवासी समाजात धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबविण्यासह, विविध मागण्यासाठी उमरखेड शहरात मोठा मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करून माहेश्वरी चौकात रोको आंदोलन सुद्धा केले.

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या धनगर आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या पंढरपूर येथे सुरु असलेल्या उपोषणाला भेट दिली असता,धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केले,यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्याने,धनगर आदिवासी आरक्षण वाद पेटला. दरम्यान उमरखेड तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने शुक्रवार दि.४आँक्टोबर रोजी १ वाजता उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन आदिवासी समाजाने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना दिले,त्या अगोदर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून निघालेल्या मोर्चात आदिवासी समाजातील हजारोंच्या संख्येने महिला,
पुरुष तरुण सहभागी झाले होते, बिरसा मुंडा की जय, डॉ,बाबासाहेब आंबेडकर की जय,जय बिरसा जय आदिवासी अशा घोषणेने उमरखेड शहर दणाणून गेले होते.

बाजार समितीच्या मैदानातुन निघालेला मोर्चा माहेश्वरी चौकात जाऊन तेथे रास्ता रोको करण्यात आले,मोर्चा मधील आदिवासी समाजाने रास्ता रोको केल्या मुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान महाराष्ट्रातील धनगर जात असून आदिवासी ही जमात असल्याने,धनगर समाज आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नाही,
तरी महाराष्ट्रातील आदिवासी आरक्षणाच्या सुचितील ३६ नंबरची जमात ओरान धनगड असून,धनगर नाही तरि धनगर समाज धादांत खोटा बोलत असून, सरकारच्या डोळ्यात धूळ फेकत आहे.तरी धनगर जात ही आदिवासी नसून,आदिवासींचे आरक्षण व सवलत धनगरांना देऊ नये, धनगर समाजाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या टाटा या समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा,अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेल्या आदिवासींच्या १२५०० जागा तात्काळ भराव्या व आदिवासी पेसा १७ संवर्गातील भरती प्रक्रिया तातडीने राबवावी अशा अनेक मागण्या आदीवासी समाजाच्या वतीने करण्यात आल्या.

यावेळी साहित्यिक प्रा. माधवराव सरकुंडे, आदिवासी पँथर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रशांत बोडखे, आदिवासी कृती समिती सर्व पदाधिकारी सर्व सामाजिक संघटना तथा आदिवासी बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता.