चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ‘आनंदोत्सव कार्यक्रमाचे’ आयोजन

27

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी सौ.एम.टी.शिंदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील, एम.बी.पावरा, एस.जी. पाटील, बी.एच.देवरे, नितेश सोनवणे व शुभांगी पाटील आदि उपस्थित होते.यावेळी अभिजात मराठी भाषा समितीने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.एम.एल.भुसारे यांनी अभिजात मराठी भाषा समितीचे कार्य, संशोधन तसेच अभिजात मराठी भाषेसंदर्भातील निकष, ऐतिहासिक पुरावे, संविधानिक तरतुदी, अभिजात भाषेची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, ही मराठी भाषिकांच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठीच्या संशोधनावर भर दिला जाईल. मराठीच्या संशोधनासाठी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुदान प्राप्तीस वाव मिळेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषिकांनीही आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे’.यावेळी त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जा प्राप्ती संदर्भातील फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.