दुर्गुणांचे सिमोल्लंघन करूयात……

30

 

 

 

 

 

 

दसरा सण मोठा

नाही आनंदाला तोटा

झेंडूचे तोरण घरा-दारा

सजली ओसरी आणि ओटा…..

 

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये ‘दसरा’ या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाला ‘दशहरा’ आणि ‘विजयादशमी’ असेही म्हणतात. मुळात हा शब्द दश म्हणजे दहा मुख असणाऱ्या रावणाचा पराभव करणारा दिवस. या अर्थाने ‘दशहरा’ असेही वापरला जातो. तसेच हा दिवस विजयाचा असल्याने आश्विन शुद्ध दशमी या तिथीवर येणार्‍या या सणाला ‘विजयादशमी’ असेदेखील म्हटले जाते.

 

या सणाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माता दुर्गा देवीने अन्यायी, अत्याचारी रक्षासासोबत युद्ध करून रक्षासाचा पराभव केला. घोर दैत्य महिषासुर याचा वध केला. महिषासुरमर्दिनी दुर्गा माता विजयी झाली. याच भवानी मातेच्या आशीर्वादाने, देवीच्या आशीर्वादाने नवरात्र व्रत करून मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी बलाढ्य दशानन रावणाचा वध केला. याच दिवशी पांडवांचा वनवासाचे शेवटचे अज्ञात वासाचे वर्ष संपले. वनवास संपल्यानंतर पांडवांनी शमी वृक्षाची पूजा करून या वृक्षाच्या डोलीमध्ये ठेवलेले आपले शस्त्र पुन्हा धारण केले. धारण केलेल्या शस्त्रांची पूजा केली. कालांतराने कौरवां सोबत युद्ध करून त्यांचा पराभव केला. त्यामुळे शस्त्र पूजेचाही हा दिवस आहे.

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे. या अर्थाने सुद्धा ‘दसरा’ या सणाला फार महत्त्व आहे. खरेतर दसरा म्हणजे कृषी उत्सवच आहे. पावसाळ्यामध्ये पेरल्या गेलेले धनधान्य याच दिवसात काढणीला येते. याचेच प्रतिक म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीसमोर जी घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्या ठिकाणी घट मांडले जातात. तिथे धान्य पेरले जाते. त्या धान्यावर देवीचा कलश मांडला जातो. नवविध भक्तीने नवरात्रीचा सण साजरा केला जातो. बरेच जण या दिवसांमध्ये उपवास करतात. अनवाणी पायाने चालतात. अष्टमीच्या दिवशी देवीसमोर होम-हवन केले जाते. नऊ दिवस पारणे करून दहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमीला पारणे सोडण्यात येते. हे घट उठवले जातात. विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केले जाते. याच दिवशी घटावर पेरलेले धान धारण करण्याची पद्धत बऱ्याच भागात प्रचलित आहे. पूर्वी लोक फेट्यावर घटातील धानाचे तुरा लावायचे. आता डोक्यावरची टोपीमध्ये तुऱ्याप्रमाणे हे धान लावल्या जाते. हेच धान प्रत्येक देवाला अर्पण करण्याची पद्धत आहे. धानासोबतच दसरा सणासाठी सोन्याचा मान असणारी आपट्याची पाने सुद्धा देवाला अर्पण केली जातात. म्हणून खऱ्या अर्थाने ‘दसरा’ हा कृषी उत्सवच आहे.

 

 

प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्याच्या पद्धती आहे. या नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रातील भोंडला आणि गुजरात राज्यातील गरबा फार प्रसिद्ध आहे. बऱ्याच राज्यात दांडिया सुद्धा खेळल्या जातो. बहुतेक करून संपूर्ण देशभर या दिवसात गरबा आणि दांडिया खेळला जातो. उत्तर भारतात नऊ दिवस रामलीलेचे नाट्यीकरण चालू असते. महाराष्ट्रातील कोकण भागातही रामलिला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. नऊ दिवस प्रभू श्रीरामाच्या चरित्रावर आधारित राम लीलेचे वेगवेगळे प्रयोग लोकांसमोर सादर केले जातात. दहाव्या दिवशी दशमुख रावणाचा आणि कुंभकर्णाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला जातो. रावणाचा पुतळा जाळणे म्हणजे अधर्म आणि अनिती याचे प्रतीक असणारा रावण याचे दहन करणे होय. त्याच प्रमाणे आपणही आपल्या जीवनातील सर्व दुर्गुणांचे या दिवशी दहन केले पाहिजे. आपल्या स्वभावातील वाईट गुण संपून टाकून, चांगल्या गुणांची कास धरली पाहिजे.

 

 

दसऱ्याला, विजयादशमीला सोने म्हणून आपट्याची पाने वाटली जातात. आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोन्यासारखे महत्त्व असते. माणसे एकमेकांना भेटतात. एकमेकांना सोन्याच्या रुपात आपट्याची पाने देतात. ‘सोने घ्या, सोन्यासारखे रहा….’ असे म्हणतात. गळाभेट घेतात. ‘आला आला दसरा… राग-लोभ सारे विसरा…’ असेही म्हटले जाते. दसऱ्याच्या सणाला मागील सर्व विसरून पुन्हा एकत्र येण्याची पद्धत आहे. या दिवशी सर्व स्तरातील सर्व लोक एकत्र येण्याची पद्धत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी ‘दसरा’ हा सणसुद्धा महत्त्वाचा शुभमुहूर्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी आपण करू शकतो. याच दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरूवात करता येते. हमखास खात्रीने विजय मिळवून देणारा दिवस असल्याने याला ‘विजयादशमी’ असे म्हणतात.

 

दसऱ्याला आपट्याच्या पानाला सोन्याचे महत्त्व का देण्यात आले…..? याबद्दल एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते. फार प्राचीन काळात वरतंतू नावाचे ऋषी होते. त्यांच्याकडे अनेक शिष्य शिक्षण घेण्यासाठी येत. असाच कौत्स नावाचा शिष्य त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला. वरतंतू ऋषीने त्याला चौदा विद्या शिकवल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. कौत्साने आपल्या गुरु समोर हात जोडून विनंती केली की, “आपण आम्हाला चौदा विद्या देऊन पारंगत केले. याची गुरूदक्षिणा आपण घ्यावी. मी आपणास काय गुरुदक्षिणा देऊ….? तुम्ही जी गुरुदक्षिणा मागाल ती मी देण्याचा प्रयत्न करेन….? यावर वरतंतू ऋषी म्हणाले, “प्रिय शिष्य…. ज्ञान हे दान करण्यासाठी असते. त्याचा बाजार केला जाऊ नये. तुम्ही विद्येने पारंगत झालात हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा आहे.” तरीही शिष्याने आपला आग्रह कायम ठेवला. यावर वरतंतू ऋषीने आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की मी तुला चौदा विद्या शिकवल्या. त्यामुळे त्याचा मोबदला म्हणून प्रत्येक विद्यासाठी एक कोटी सुवर्ण मुद्रा म्हणजे एकूण चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तू मला दे. गुरूने मागितलेली गुरुदक्षिणा देण्याचे शिष्याने कबूल केले. तो 14 कोटी सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी निघाला. खूप प्रयत्न करूनही त्याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मिळाल्या नाहीत. मग त्याने दानशूर राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रघुराजाकडे मदत मागण्याचे ठरवले. तो रघुराजाकडे गेला. आपल्याला गुरुदक्षिणे साठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा ची आवश्यकता आहे. दान मागण्यासाठी याचक म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. असे सांगितले. रघुराजा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता त्याच्याकडे आलेल्या कुठलाही याचक रिकाम्या हाताने परत जायचा नाही. परंतू रघुराजाने नुकतेच आपले सर्व धन दान केल्यामुळे, त्याच्याजवळ कौत्साला देण्यासाठी सुवर्णमुद्रा नव्हत्या. म्हणून रघुराजाने कौत्साकडे तीन दिवसांचा वेळ मागितला. या तीन दिवसांमध्ये रघुराजाने इंद्रावर आक्रमण करण्याचे ठरवले. इंद्राला ही बातमी समजताच इंद्र घाबरला, कारण रघु राजाचा पराक्रम इंद्राला माहीत होता. त्यामुळे इंद्राने कुबेराला आज्ञा केली की, तू रघुराजाच्या राज्यावर म्हणजे आयोधेच्या सीमेवर आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाड. त्याप्रमाणे इंद्राने आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला.

ह्या सुवर्णमुद्राचा आकार आपट्याच्या पाना सारखा होता. सुवर्ण मुद्रांच्या पावसाबद्दल रघुराजाला समजताच त्याने त्या सुवर्ण मुद्रा कौत्साला दान केल्या. कौत्साने त्या सुवर्णमुद्रा आपल्या गुरूला दिल्या. परंतु गुरूने त्या घेतल्या नाहीत. म्हणून परत राजाला दिल्या. परंतु राजा म्हणाला, “एकदा केलेले दान मी परत घेत नाही.” म्हणून त्या सुवर्णमुद्रा घेतल्या नाहीत. मग या सुवर्णमुद्रा त्याच आपट्याच्या झाडाखाली कौत्साने ठेवल्या आणि राज्यातील सर्व जनतेला त्या घेऊन जायला…. लुटायला सांगितल्या. राज्यातील सर्व प्रजा आली त्यांनी प्रथम आपट्याच्या झाडाचे पूजन केले आणि त्यानंतर प्रत्येकाने या सुवर्णमुद्रा लुटल्या. त्यामुळे त्या दिवसापासून सोने लुटण्याची पद्धत सुरू झाली.

दसऱ्याच्या दिवशी विद्येची देवता माता सरस्वतीचे पूजन केले जाते. याच दिवशी विद्येचा आरंभ करणारी पाटी यावर सरस्वतीची प्रतिमा काढली जाते…. या प्रतिमा रुपीस सरस्वतीचे पूजन केले जाते. याच दिवशी व्यापारी लोक आपल्या वह्यांचे पूजन करतात.‌ तसेच हा दिवस शस्त्रास्त्र पूजनाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सर्व क्षेत्रातील व्यक्ती आपापल्या शस्त्रांची पूजा करतात. मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मशनरीची पूजा केली जाते. शेतकरी आपल्या शेती अवजारांची पूजा करतात. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपापल्या शस्त्रांचे पूजन करतो. लेखक, कवी, साहित्यिक या दिवशी आपल्या शस्त्ररुपी लेखणीचे पूजन करतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक शुभ कार्य केली जातात. भूमिपूजन केले जाते. दुकानांचा शुभारंभ होतो. पुस्तके प्रकाशित केली जातात.

 

दसऱ्याच्या मुहूर्तावर अपराजिता देवीचे सुद्धा पूजन केले जाते. याच दिवशी ऐतिहासिक काळापासून ‘सीमोल्लंघन’ करण्याची पद्धत आहे. राजेशाही काळात राजे मोठमोठ्या लढाईची सुरुवात या दिवशी सीमोल्लंघन करून करायचे. मधल्या काळात लोक दुसऱ्या गावातील लोकांशी संपर्क करण्यासाठी व्यापार करण्यासाठी आपल्या गावाचे सीमोल्लंघन या दिवशी करायचे. सीमोल्लंघन करताना सीमेवरील आपट्याच्या वृक्षाचे…. म्हणजेच अश्मांतक वृक्षाचे…. , शमी वृक्षाचे पूजन केले जायचे. देवदेवतांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन नंतर सीमोल्लंघन केले जायचे. आजही सीमोल्लंघनाला फार महत्त्व आहे. गावोगावी, शहराशहरांमधून मोठ्या उत्साहाने सीमोल्लंघन केले जाते महाराष्ट्रातील कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव जगभर प्रसिद्ध आहे.

 

आजच्या काळात या दसरा मुहूर्तावर आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने सीमोल्लंघनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या स्वभावातील दुर्गुण नाहीसे करणे…. नष्ट करणे…. त्यांना हद्दपार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेले खरेखुरे ‘सीमोल्लंघन’ आहे. तेच करणे काळाची खरी गरज आहे.. तरच हा सण खऱ्या अर्थाने सत्याचा असत्यावरील धर्माचा अधर्मावरील विजय ठरेल.

 

*विजयादशमी*……

 

 

महिषासुर राक्षस

मारिला दुर्गा देवीने

दुष्ट रावणाचा वध

केला प्रभू श्रीरामाने

 

 

ऐतिहासिक वारसा

आहे दसरा ह्या सणाला

याच दिनी वृद्धी येते

शेतीच्या धनधान्याला

 

 

सोन्याचा मान दिलाय

आपट्याच्या त्या पानाला

झेंडूच्या फुलांची माळ

शोभे घराच्या दाराला

 

 

सोने देऊन घेऊन

गळाभेट प्रत्येकाला

दर्शनास जाती सारे

देवीच्या सीमोल्लंघनाला

 

 

साडेतीन मुहूर्तामधला

आहे मुख्य मुहूर्त

शुभ कार्याची सुरुवात करा

मनी भाव ठेवावा आर्त

 

 

नवरात्र महोत्सव

नाही सीमा आनंदाला

नऊ दिन उपवास

पारणे हे दसऱ्याला

 

 

शस्त्रपूजन, सरस्वतीपूजन

करतात सारेजन उत्साहाने

अपराजिता देवीचे पूजन

केली जाते भक्तिभावाने

 

 

मयूर मधुकरराव जोशी
विठ्ठल-रुक्मिणी नगर , जिंतूर. जि. परभणी मो. 9767733560