चोपडा महाविद्यालयात विद्यापीठ पुरस्कार प्राप्त प्राचार्य व गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

101

 

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने
नुकतेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना व प्राचार्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.एल.बी.पटले तसेच मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.एम.एल. भुसारे या दोन्ही प्राध्यापकांना ‘संशोधन पुरस्कार’ (स्वामित्व हक्क) पेटंटसाठी पुरस्कार जाहीर झाला. तसेच डॉ.एल.बी.पटले यांना ‘संशोधन पुरस्कार (पब्लिकेशन) प्रकाशन’ हा पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा महाविद्यालयातील डॉ.मोहम्मद राकीब मोहम्मद उस्मान यांची ‘संशोधन पुरस्कार (स्वामित्व हक्क) पेटंट’ पुरस्कारासाठी निवड झाली.
महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे या सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त प्राचार्य व प्राध्यापकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, सौ.भारती सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, पर्यवेक्षक ए. एन.बोरसे, मनीष देसले, डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे, डॉ.एच.ए.एच.साळुंखे, आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या मार्गदर्शनामुळे व संस्थेच्या कुशल प्रशासकीय कार्यपद्धतीच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा लाभली’ असल्याचे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल.भुसारे, डॉ.मोहम्मद रकीब मोहम्मद उस्मान इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करताना संशोधनासाठी संस्थेने दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘प्राध्यापकांनी शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांवर संशोधन करून विद्यार्थी हित तसेच समाजहित जोपासायला हवे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत असलेल्या संशोधन कौशल्याचा शोध घेऊन त्यांच्यात संशोधनाची बीजे रुजविली तर उद्याचे संशोधक घडायला मदत होईल. या अनुषंगाने प्राध्यापकांनी प्रयत्नशील राहायला हवे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.