वरुड नृ, वडाळी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

48

 

(प्रतिनिधी-सौ अश्विनी जोशी)

जिंतूर – (18 ऑक्टोबर )-वरुड नृ, वडाळी, गावामध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत वरुड नृ, वडाळी या गावामध्ये मतदाराची टक्केवारी कमी असल्याने येथे विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे नियोजित आहे. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे. प्रत्येकाने आपला अमूल्य मताधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले व मयूर जोशी यांनी केले. स्वीप पथकातील सदस्य आणि कवी शंकर माने यांनी आपल्या सुश्राव्य आवाजात गीतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

स्वीप पथकातील सदस्य आणि साहित्यिक मयूर जोशी खालील आशयगर्भ कविता आणि गीतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

(ताई, माई, बाई, अक्का
जागे व्हा रे सारे जण
दादा, भाऊ, मामा, काका
करा करा मतदान….)

(ए ऐक जरा मतदारा
तुला लोकशाहीची आण
कर खुशाल निर्भयतेन
तुझ्या हक्काच मतदान…..

नको प्रलोभणे नको कशाचा दबाव
नको कशाची ही सक्ती नको करू हाव)

या कविता, गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वीप पथकातील सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी मतदारांना प्रतिज्ञा दिली. वरुड नृ, वडाळी या गावात चुनाव पाठशाळा, चौका-चौकात लोकशाही गप्पा, पथनाट्य याद्वारे स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सटवाजी घनसावंत, गजानन कुरे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सतीश बंनटरवार, रमेश तरटे, किरण रेघाटे, ज्ञानेश्वर भोंबे, शिक्षक संतोष देशमुख, प्रवीण डांगे, श्रीमती सुनीता मगर, श्रीमती अल्का खिल्लारे, उमेश तायडे, सखाराम चाटे, चौधरी काळे, श्रीमती क्षीरसागर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात नवमतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार, आणि सर्वच मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.