✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चंद्रपूर(दि.18नोव्हेंबर):-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. याच अनुषंगाने आज (दि.18) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील इतर कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे एकाच वेळी जिल्ह्यातील विविध आस्थापनांच्या नागरिक / मतदारांनी मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुक कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राकरीता दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. सामुहिक प्रतिज्ञेसाठी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयात प्रतिज्ञा घेतली.
यात खाजगी व शासकीय महाविद्यालये/ अभियांत्रिकी महाविद्यालये / आयटीआयचे विद्यार्थी, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ, विविध महिला बचत गट, जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांचे कर्मचारी, मनरेगा जॉबकार्डधारक मजुर व औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या कर्मचा-यांचा सहभाग होता.