बुद्ध मूर्ती आणि पंचशील ध्वज हटविण्याच्या कारवाईचा रि. पा. इं. तर्फे निषेध-अडँ. जयदेव मून

212
Advertisements

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12डिसेंबर):- तालुक्यातील मौजा गदगाव येथील बौध्द समाज अनेक वर्षांपासून गावातील भुमापन क्र. 94 व 95, प्लॉट क्र. 28, आराजी 0.07 हे. आर. या आबादी जागेवर समाजाच्या वतीने तथागत बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे कार्यक्रम करीत होता. या जागेवर समाजाने श्रद्धेने पंचशील ध्वज आणि शांतिदूत तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती बसविली होती. दिनांक 3 डिसेंबर 24 रोजी प्रशासना द्वारे पोलीस बंदोबस्त लावून बुद्ध मूर्ती आणि पंचशील ध्वज हटविण्यात आला.

यामुळे बौध्द समाजाच्या भावना दुखावल्या असून हा समाजावर अन्याय आहे. अश्या प्रकारच्या वेदनादायक भावना समाजाने रि. पा. इं च्या पदाधिकाऱ्यां जवळ व्यक्त केल्या. या घटनेची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी वि. तु. बुरचुंडे आणि प्रदेश महासचिव सिद्धार्थ सुमन यांनी गदगाव येथे भेट दिली असता बुद्ध विहार गदगाव येथे पार पडलेल्या समाज बैठकीत प्रशासनाच्या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया द्वारे निषेध करण्यात आला.

यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष अँड. जयदेव मुन, भद्रावती तालुका अध्यक्ष संतोषभाई रामटेके, वरोरा तालुका अध्यक्ष अनिल वानखेडे, उपाध्यक्ष पुरषोत्तम वैद्य, भद्रावती महिला आघाडी अध्यक्षा नंदा रामटेके, शेवंताबाई मेश्राम, वरोरा महिला आघाडी अध्यक्षा छाया लाभाने, कवडू कांबळे हे होते.

बौध्द पंच कमिटी गदगाव तर्फे दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी तहसीलदार चिमूर यांचे कडे अर्ज करून समाजाच्या सामाजिक, धार्मिक कार्या करिता सदर जागेची मागणी करण्यात आली होती. या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु गावातील इतर समाजातील काही लोकांनी सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे. याकरिता विना परवानगी मोर्चा काढून अर्ज दिला. त्यावर मात्र तहसीलदार यांनी तत्परता दाखवीत सदर जागेवरील अतिक्रमण हटविले. प्रशासनाच्या या जातीयवादी मानसिकतेच्या कृती मुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशी संवेदना समाजाने या बैठकीत व्यक्त केल्या.

गावात हनुमान मंदिर, मानकादेवी मंदिर, नंदिकाठावरील मंदिरे सुद्धा अतिक्रमाणाच्याच जागेवरती आहेत. त्याचा बौध्द समाजाने कधी विरोध केला नाही. गावात सामाजिक सलोखा आणि शांताता राहावी हीच समाजाची इच्छा आहे. परंतु प्रशासनाच्या या कारवाई ने मात्र गावात सामाजिक तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने यावर गंभीर विचार करून बौध्द समाजास न्याय द्यावा अशी समाजाची मागणी आहे. या मागणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ पाठिंबा असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आला असल्याची माहिती चिमूर तालुका अध्यक्ष अँड. जयदेव मुन यांनी दिली.