आपल्या सर्वांना कोण समानतेने बघत असेल, वागवत असेल तर तो आहे निसर्ग. माणसाच्या जीवनात कोणी दृष्टी देऊ शकते ती म्हणजे सृष्टी. पण आज माणूस हे विसरलाय की तोही निसर्गाचा एक भाग आहे. उगवता सूर्य, खळखळ वाहणारा झरा, संथ वाहती नदी, हुंकार भरणारा समुद्र, पक्ष्यांचा गोड किलबिलाट, शिरशिरी भरणारा वारा हे ऐकूनच आपल्या मनाला किती सुखद अनुभव होतो. आपण अलगद निसर्गाच्या कुशीत जाऊन बसतो. पण आज हे फक्त कल्पनेतच उरले आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
सगळे मुद्दे मग राजकीय असू दे, आर्थिक असू दे की आणखी काही ते बाजूला पडतात ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती समोर उभी राहते. आपल्या समोर निसर्ग विक्राळ रूप धारण करतो त्यावेळी आपण कोण? याला काहीही अर्थ राहत नाही. अशावेळी एका क्षणात निसर्गासमोर आपण किती खुजे आहोत याची जाणीव आपल्याला होत राहते. निसर्ग विलोभनीय पण त्याची छेडछाड केली तर तितकाच भयंकर. मग केदारनाथची घटना असू की आताची वायनाडची. कुठे ना कुठे या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत.
आपली सुरुवात कुठून झाली होती? म्हणजेच अश्मयुगीन कालखंडापासून आपण मानव उत्क्रांतीचा इतिहास रचला. आपल्यात शोध प्रवृत्ती होती. कुतूहल होते. या शोधाला हळूहळू विचारांच्या प्रवाहात आणले. आणि विचार करणे ही माणसाची ओळख बनली. विचारांच्या ताकदीने माणसाने दसदिशा पादक्रांत केल्या. निसर्गातील नवीन शोधांना रहस्यांचा शोध घेतला ज्याला आपण विज्ञान म्हणतो. त्या शोधाला त्याने स्वतःच्या सुखासाठी उपयोगात आणले. वैचारिक प्रगती करता करता माणूस भौतिक सुखात अडकायला लागला तिथे ही उत्क्रांती एका विध्वंसाकडे वळली आणि पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात झाली.
महत्वकांक्षी माणसाने समाधान सोडून लालसा आपलीशी केली. ज्या पंचतत्वाने स्वतःची निर्मिती झाली त्याच पंचतत्वांवर कब्जा करण्याची प्रवृत्ती माणसात रुजली. वसुधैव कुटूंबकम आपण बोलतो पण खरंच तसे वागतो का? ही धरती माझी, सगळे जग माझे कुटुंब पण आपण आपल्याच जमिनीशी बेइमानी करतो. आपली म्हणणारी माणसं आता आहेत तरी कुठे? आज अंदाधुंद विकासासाठी चाललेली झाडतोड, नदीच्या नदी विकली जाणे, जमिनीखालील खनिज आणि पाणी शोषून घेतले जात आहे त्यासाठी जमिनीचा आणि नैसर्गिक ठेवींचा विध्वंस होतोय. याची प्रत्येक सामान्य माणसाला जाणीव नक्कीच आहे. पण त्या जाणिवेचे तो काहीच करत नाही किंबहुना त्याला काही करताच येत नाही. मी माझं आणि माझा परिवार या चौकटीपुढे माणसाला काहीच दिसत नाही. आज राजनैतिक गोष्टी असू दे किंवा सामाजिक असू दे तावातावाने आपल्याच माणसाशी भांडणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. पण पर्यावरणासाठी जिथे आपण राहतो त्या परिसरातील स्वच्छ्ता, निसर्ग यासाठी कोणीही पुढे येत नाही. निसर्ग असमानता दाखवत नाही अगदी श्रीमंत असो किंवा गरीब, राजा असो किंवा रंक त्याच्या विध्वंसापुढे सर्वच थिटे पडतात.
आपणा सर्वांनाच हे चांगल्या रीतीने माहिती आहे की, आपण सर्वात शेवटी जी शांतता आणि समाधान शोधतो ती निसर्ग भरभरून आपल्याला देतो. आपला थकवा, आपला मूड निसर्गाच्या सान्निध्यात चांगला होतो. असे असतांनाही माणसाने सिमेंटचे जंगल आपलेसे केले. निसर्गाच्या विरोधात वागणे सुरू केले. झाडे लावा झाडे जगवा आपण एक झाड तर लावू.. या केवळ ओळी आहेत. पण जंगल कसे निर्माण करणार. निसर्गाच्या चक्रांना कसे ठीक करणार?
आज प्रत्येक व्यक्तीची प्राथमिकता फक्त भौतिक सुखाची आहे. साधं उदाहरण घेतले की सिगरेट किंवा गुटख्याच्या पाकिटावर चित्रसहित मृत्यूची सूचना दिलेली असते तरीही माणूस ते विष खायला कमी करत नाही. कारण त्याची प्राथमिकता क्षणिक सुखाची आहे. निसर्गाबद्दल माणूस असाच वागतोय.पण सुरुवात करावीच लागणार आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला उत्तर देण्यासाठी. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी घेऊन येत आहे नाटक “The… Other world’. युरोप मध्ये जर्मनीतील प्रमुख शहरांमध्ये या नाटकाने हुंकार भरली. भारतीय मातीतून जन्मलेला सिद्धांत थिएटर ऑफ रेलेवन्सचे हे नाटक प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मुळाशी घेऊन जात निसर्गाच्या जाणिवेचा स्पर्श देण्यासाठी सज्ज आहे. युरोप मध्ये गाजलेले आणि आता भारतात सर्वत्र प्रस्तुत होण्यासाठी सज्ज थिएटर ऑफ रेलेवन्स चे नवीन नाटक ‘The..Other world’. याचे लेखक दिग्दर्शक आहेत मंजुल भारद्वाज. इकोलॉजी आणि गरीबी वर भाष्य करणारे आणि प्रत्येक व्यक्तीला निसर्गाची परत एकदा जाणीव करून देणारे नाटक 21 डिसेंबरला सकाळी 11 वाजता श्रीशिवाजी मंदिर येथे सादर होत आहे.
✒️अश्विनी नांदेडकर(थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंगकर्मी)मो:-9619047379