शब्दगंध चे कार्य भावी पिढीस प्रेरणादायी ठरावे : पद्माकांत कुदळे 

59
Advertisements

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोपरगाव /अहिल्यनगर(दि.28जानेवारी):-“ शब्दगंध ही नवोदितांना प्रेरणा देणारी संस्था असून कोपरगाव मध्ये शब्दगंध ची सुरुवात नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी ठरेल, ऐश्वर्या संपन्न संस्कृती असणाऱ्या कोपरगाव मध्ये लेखकांची व साहित्यिकांची कमी नसून ही भूमी सर्वांना प्रेरणा देणारी आहे, त्यामुळे सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीत्या हातांना पाठबळ मिळेल,” असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी केले.

          शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने कोपरगाव तालुका शाखेच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी विचारपिठावर शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, प्रमुख व्याख्याते कवी अमोल चिने,नूतन अध्यक्षा ऐश्वर्याताई सातभाई व कार्याध्यक्ष सुधीर कोयटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

       मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. ग्रंथ व नॅपकीन बुके देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना ऐश्वर्याताई सातभाई म्हणाल्या की, ” शब्दगंधने आमच्या सारख्या नवोदितांना प्रेरणा देऊन लिहिते केले, अनेक पुस्तकांचे प्रकाशन करून नवोदितांना आपली एक वेगळी ओळख करून देऊन समाजात साहित्यिक जागृती निर्माण करण्या साठी आणि नव साहित्यिक निर्माण होण्यासाठी प्रेरणा दिली, म्हणूनच शब्दगंध ची कोपरगाव तालुका शाखा सतत कार्यरत आहे. अधिकाधिक नव साहित्यिकांना जोडण्याचे काम यापुढील काळात केले जाईल. महाविद्यालयीन युवक युवतींना शब्दगंध सोबत जोडले जाऊन साहित्यिक चळवळ वाढवण्याचे काम केले जाईल.”

    याप्रसंगी सुधीर कोयटे, प्रा.डॉ अशोक कानडे,सुनील गोसावी, राजेंद्र फंड यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्याते अमोल चिने यांनी महाराष्ट्रातील विविध कवींच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, मसाप चे अध्यक्ष डॉ. हिरालाल महानुभाव,संदीप वर्पे, प्रसाद नाईक, डॉ.धरम मॅडम,संतोष तांदळे, दिलीप दारुणकर, बबलू वाणी, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ.सुधाताई ठोळे, कार्याध्यक्ष विजय बंब, डॉ.विलास आचारी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, माजी नगरसेविका सौ.प्रतिभा शिलेदार, वनिता मंडळाच्या भगिनी यांच्यासह अनेक साहित्यिक,साहित्य रसिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध चे माजी अध्यक्ष कैलास साळगट यांनी केले तर स्वागत प्रा.डॉ.संजय दवंगे यांनी केले. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित केले. या प्रसंगी वंदना चिकटे, ऍड.श्रद्धा जवाद, स्वाती मुळे, शैलजा रोहोम, बाळासाहेब देवकर,अजीत कसाब, प्रमोद येवले, हेमचंद्र भवर यांच्या निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. वंदनाताई चिकटे यांनी आभार मानले.प्रा.कवी अमोल चिने यांनी शेती शेतकरी व्यथा आणि कथा, माणसाच्या जीवनात मित्रांचे महत्त्व, राजकीय रंगत व्यक्त करणारी काव्यरचना सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे निमंत्रण सर्वांना देण्यात आले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध चे पदाधिकारी व सदस्यांनी यथोचित नियोजन केले.