डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

    55
    Advertisements

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.20ऑगस्ट) :- सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विज्ञानवादी, सुधारणावादी विचारांची चळवळ पुढे घेऊन जात अघोरी प्रथा व अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त (२० ऑगस्ट) आदरांजली वाहिली आहे.

    दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. दाभोलकर वैद्यकीय तज्ञ होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कबड्डीपट्टू, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू होते. ते विचारवंत होते. लेखक होते. पत्रकार होते. महत्वाचं म्हणजे ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. बुद्धीवादी, विज्ञानवादी, सुधारणावादी, चिकित्सक समाजाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी जीवनभर निष्ठेनं कार्य केलं. अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ उभी केली. अशिक्षित, अज्ञानी, दुर्बल घटकांचे शोषण करणाऱ्या अनिष्ठ रुढी, अघोरी प्रथा, समाजविघातक अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन केले.

    जनजागृती केली. विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे, या दृढ विश्वासातून ते निष्ठेने काम करीत राहिले. त्यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची झालेली हत्या हे दुर्दैवं असून व्यक्तीच्या हत्येने त्यांचे विचार कधीही संपत नाहीत, हा इतिहास आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकर यांना आदरांजली वाहून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.