

▪️समाजसेवेचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.18फेब्रुवारी):-खरकाडा येथील प्रतिष्ठित नागरिक, गुरुदेव सेवामंडळाचे तसेच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, तंटामुक्त समितीचे माजी सदस्य तथा सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रणी असलेले श्री. गोविंदा सदाशिव मेश्राम यांचे काल दिनांक 17/02/2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने खरकाडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्री. मेश्राम हे अत्यंत प्रेमळ, मनमिळावू व आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित होते. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजहितासाठी अखंड झटणारे हे व्यक्तिमत्त्व होते. गुरुदेव सेवामंडळाचे कार्य त्यांनी संपूर्ण आयुष्यभर तन-मन-धनाने केले. ग्रामविकास, सामाजिक सलोखा व धार्मिक उपक्रम यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.
खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे सुमारे 30 वर्षांपूर्वी महाशिवरात्र यात्रेचे सुरुवात करण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. या यात्रेमुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवी दिशा मिळाली. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शैक्षणिक सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांचे हित आणि गावाच्या उन्नतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत.
तंटामुक्त समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी गावातील वादविवाद शांततेने मिटवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. सामाजिक एकोपा, सलोखा आणि बंधुभाव जपणे हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव श्री. लक्ष्मण गोविंदा मेश्राम हे नेवाजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत.
श्री. गोविंदा सदाशिव मेश्राम यांच्या निधनाने एक निस्वार्थी समाजसेवक, धार्मिक कार्यकर्ते व आदर्श नागरिक आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. त्यांच्या कार्याची आठवण समाजात सदैव प्रेरणादायी ठरेल.







