राज्यस्तरीय विद्यार्थी सेमिनार स्पर्धेचे ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे यशस्वी आयोजन

115

 

 

चिमूर– ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे राज्यस्तरीय विद्यार्थी सेमिनार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स इंडिया, नागपूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचा मूलभूत अभ्यास, आधुनिक वैज्ञानिक प्रगतीविषयी जागरूकता आणि ॲकॅडमिक सादरीकरण कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.
या स्पर्धेचे उद् घाटन नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स इंडिया, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. एन. एस. गजबिये यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा एस. आस्वले, डॉ. अरुण आमले आणि समन्वयक डॉ. हुमेश्वर आनंदे उपस्थित होते. उद् घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी प्रा. सुरेश उमरे, सल्लागार, NASI नागपूर चॅप्टर व रसायनशास्त्र विभाग, व्हीएनआयटी, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना पॉलीमर,त्याचे वेगवेगळे प्रकार व दैनदिन जीवनात त्याचा उपयोग यावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
ही स्पर्धा विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैविक रसायनशास्त्र, अजैविक रसायनशास्त्र, भौतिक रसायनशास्त्र, विद्युत रसायनशास्त्र आणि हरित रसायनशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर सादरीकरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यास सात मिनिटांचे सादरीकरण आणि तीन मिनिटांच्या प्रश्नोत्तर सत्रासाठी वेळ देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले विषय सादर केले.
राज्यातील विविध महाविद्यालयांमधून ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पदवी आणि पदव्युत्तर गट असे दोन वेगवेगळे गटात ही स्पर्धा पार पडली. परीक्षक म्हणून डॉ. के. आर. लांजेवार मोहशिनभाई झवेरी महाविद्यालय, देशाईगंज, प्रा. एस. एम. सोनटक्के महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय आरमोरी , श्री. राहुल ठेंगे, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि डॉ. आशिष वाकुलकर,आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांनी स्पर्धेचे मूल्यांकन केले.या स्पर्धेदरम्यान परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रभावी सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या तंत्रांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सेमिनारचे विषय कसे निवडावेत, वेळेचे नियोजन कसे करावे, तसेच उत्कृष्ट सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या अशा सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली. या सेमिनार स्पर्धेमध्ये पदवी गटातून हिमांशू कोर्टरंगे प्रथम, मैथिली पुंड द्वितीय, मानसी वितोंडे तृतीय तसेच पदव्युत्तर गटातून ज्योती ठावरी प्रथम, अभिलाषा कुलसंगे द्वितीय,अंजली बावनकर तृतीय क्रमांक घेऊन विजेते ठरले. विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या राज्यस्तरीय विद्यार्थी सेमिनार स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंदांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.