गेल्या अनेक दिवसापासून गंगापूर विधानसभा क्षेञाचे आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी शिक्षक, शिक्षक संघटना यांना केंद्रबिंदू करून विधानसभेत व सभागृहाच्या बाहेर बरेच काही बोलून टाकले. एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात ते असेही बोलले की, विधानपरिषदच बरखास्त करा! कशाला पाहिजे शिक्षक व पदवीधरांचे आमदार? कशाला पाहिजे शिक्षक संघटना?
अहो बंब साहेब विधानपरिषद बरखास्त कधी होत असते का? दर सहा वर्षांनी दोन तृतीयांश आमदार निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा निवडणुकीद्वारे नवीन घेतले जातात. भारतीय राज्यघटनेनुसार ही सर्व प्रक्रिया होत असते. आपले बोलणे म्हणजे राज्यघटनेला एक प्रकारचे आव्हानंच नाही काय? राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणेच तुम्हीही देखील निवडून आलात, तसेच विधानपरिषदेचे आमदारही निवडून आलेत ना! घटनेतील तरतुदीनुसार आपण सर्वांनी आमदारकीची शपथ घेतली असेल ना!
दुसरी बाब म्हणजे आपले म्हणण्यानुसार शिक्षक संघटना कशाला पाहिजे? मा.बंब साहेब, याचीही राज्यघटनेत तरतुद आहे ना हो! अहो शिक्षकांच्या रजिष्टर्ड संघटना आहेत, ज्याची नोंद मा.धर्मदाय आयुक्तांकडे आहे. मी ज्या संघटनेचा सदस्य आहो, ती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही रजिष्टर्ड राज्यव्यापी संघटना आहे. आमची संघटना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात आहे व संघटनेचे प्राथमिक व आजीव हजारो सदस्य आहे.
मा.बंब साहेब, आपण म्हणता तेच खरे व बाकी सगळे खोटे, आपण म्हणता तेच ब्रम्हवाक्य! असे कसे होईल हे लोकशाही व कायद्याचे राज्य आहे. सगळे शिक्षक, संघटना यांची गरज नाही तर तुमची तरी गरज आहे का? साहेब कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असाल, मी माझ्या बालपणापासून बघतो आहे कारण मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. शिक्षकाचे जीवन कसे होते? हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.
अहो! फाटके कपडे, फाटक्या चड्डी बनियान, चपला, बुट, मातीच्या घरात, भाड्याच्या खोलीत, राॅकेलच्या दिव्यात व कंदिलात दिवस काढले, शेतात काबाडकष्ट केले. चिखल तुडवीत शाळेत शिकलो. आमच्या वाडवडीलांनी ५० ते ६० रूपयात नोकऱ्या केल्यात.
सन १९७७-७८ साली शिक्षकांचा संप ५४ दिवसांचा झाला महाराष्ट्रातील सर्व जेल भरले होते, तेव्हा बंब साहेब तुम्ही कुठे होता?
शिक्षकांना जे काही मिळाले ते केवळ आणि केवळ शिक्षक संघटनामुळेच, यासाठी अनेक लोकांना घरादारावर तुळशीपञ ठेवावे लागले. अनेक कार्यकर्त्याच्या घामातून, रक्ताच्या थेंबातून शिक्षक संघटना उभ्या झाल्या आहेत अनेक शिक्षकांनी वेळ, पैसा, श्रम देवून आंदोलने लढली. अन्याय झालेल्या शिक्षकाच्या घरात एक तेलाचा दिवा पेटवला. तुम्हाला हा इतिहासच माहित नाही. आम्ही शिक्षक सोन्याचा चमचा हातात घेवून जन्माला आलो नाही. परंतू आमचे ज्ञान हीच आमची संपत्ती आहे व शिक्षक संघटना हाच आमचा वाली आहे, देव आहे, आमचे व्यासपीठ आहे दुसरे तिसरे कुणीही नाही. आम्हाला न्याय देणारे, मार्गदर्शन करणारे तेच एक मंदिर आहे.जरा आमचेही ऎका, एवढीच विनंती, आपण महान आहेत राजेहो! जरा आमचेही ऎकत चला!!
✒️राजेंद्र मोहीतकर(प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा)