ग्रामगीता महाविद्यालयात ‘चिमूर माहात्म्य’ ग्रंथाचे प्रकाशन

333

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.26मार्च):- ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे इतिहास विभागातर्फे ‘चिमूर माहात्म्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिमूरच्या ऐतिहासिक, पौराणिक आणि पर्यटनविषयक माहितीवर आधारित या ग्रंथाचे प्रकाशन नगरपरिषद चिमूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान. अर्चना वंजारी यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक संतोष बाकल पोलीस स्टेशन, चिमूर आणि प्रमुख पाहुणे डॉ. अश्विन चंदेल प्राचार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर उपस्थित होते. तसेच चित्रकार मोहन सातपैसे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मान. अर्चना वंजारी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंबंधी मौलिक मार्गदर्शन केले, तर संतोष बाकल सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. डॉ. अश्विन चंदेल यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनंदा आस्वले म्हणाल्या, “चिमूरच्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यावर हा इतिहास ग्रंथाच्या रूपाने जतन करावा, अशी कल्पना सुचली आणि आज ती प्रत्यक्षात साकार झाली,” असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. या पुस्तकाच्या लेखनकार्यासाठी प्रा. संगीता हनवते यांनी खूप परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. संगीता हनवते यांनी केली, संचालन प्रा. शितल सावसाकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नोविना आत्राम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या प्रकाशन सोहळ्याला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.