Home महाराष्ट्र काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्मिला गोसावी यांची निवड

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्मिला गोसावी यांची निवड

105

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.7मार्च):-संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या संमेलनामध्ये होणाऱ्या निमंत्रिताच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली* अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा जयश्री मेटे व निमंत्रण समितीच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी दिली. 

    सीएसआरडी मधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य नगरीतील मुक्ताबाई सभागृहात संत सोयराबाई कवी मंचावर मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 1/30 वाजता होणाऱ्या निमंत्रित कवयित्रीच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्य शर्मिला गोसावी यांची निवड झाली असून त्यांना यापूर्वी नऊ काव्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सन्मान मिळालेला आहे.

वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या शर्मिला गोसावी यांचे बांगड्यांची खैरात, मनमित काव्यसंग्रह प्रकाशित असून सात विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांनी संपादित केलेल्या “वन्स मोअर मराठी कविता” या संग्रहाचा शासनाच्या ग्रंथ खरेदीत समावेश झाला होता.

         शर्मिला गोसावी यांचे अहिल्यानगर, पुणे आकाशवाणीवर अनेक वेळा काव्य वाचन झालेले असून विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून त्या गेल्या तीस वर्षापासून कार्यरत आहेत. शब्दगंध प्रकाशनच्या त्या संचालिका असून आत्तापर्यंत ग्रामीण भागातील नवोदिताची 350 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत.यावेळी कवयित्री श्रीमती नजमा शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून 20 निमंत्रित कवयित्री या काव्य संमेलनात सहभागी होणार आहेत.

शर्मिला गोसावी यांचे हेमलता पाटील, भारती गवळी,रूपाली सोनवणे, दिपाली तवले, पायल बडबडे,रूपाली गायकवाड, अश्विनी झगडे, वर्षा थोरात व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्य स्वाती ठुबे, जयश्री झरेकर यांनी अभिनंदन केले आहे.