Home महाराष्ट्र तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !!-ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर...

तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !!-ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!

149

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबईच्या एका राज्यपालांच्या नावे सहज घडलेला क्रिकेट मधील एक जागतिक विक्रम गेल्या ७६ वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेला नाही !

हे विक्रमवीर गव्हर्नर होते स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर राजा महाराज सिंह !

सर्वसाधारणपणे गव्हर्नर किंवा राज्यपालांना महत्वाच्या सामन्यांच्या वेळी निमंत्रित केले जाते ते नाणेफेकीसाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी किंवा सामना संपल्यानंतर चषक / बक्षीस वितरणासाठी.  

परंतु, मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या तीन दिवसांच्या प्रथमश्रेणी सामन्यात गव्हर्नर राजा महाराज सिंह खेळाडू व कर्णधार म्हणून प्रत्यक्ष सहभागी झाले होते. 

राज्यपालांचे एडीसी असलेले रुसी मोदी हे स्वतः क्रिकेटर होते व ते स्वतः देखील या संघाकडून खेळत होते. 

दिनांक २५ – २७ नोव्हेंबर १९५० असे तीन दिवस खेळल्या गेलेला हा प्रथम श्रेणी सामना होता बॉम्बे गव्हर्नर्स XI विरुद्ध कॉमनवेल्थ XI. 

संघाचे नाव बॉम्बे गव्हर्नर्स XI असल्यामुळे राजा महाराज सिंह यांना संघाचे कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. 

या संघामध्ये भारतातल्या नवानगर व पतियाळा अश्या दोन राजघराण्यांचे सदस्य देखील खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. राजा महाराज सिंह स्वतः पतियाळा राजघराण्याचे होते.    

बॉम्बे गव्हर्नर संघाचे सदस्य होते: एम आर रेगे, एम एस रणवीर सिंहजी (नवानगर), रुसी मोदी (गव्हर्नर साहेबांचे एडीसी होते), चंद्रकांत गडकरी, पतियाळाचे युवराज, के राज सिंह, ए के खन्ना, व्ही राजिंदर नाथ (यष्टीरक्षक), राजा महाराज सिंह (कर्णधार), सी आर रंगाचारी व गुलाम अहमद !

कॉमनवेल्थ संघाचे कर्णधार होते लेझली एम्स व सदस्य होते लेन फिशलॉक, जॉर्ज एम्मेट, जॅक इकिन, केन ग्रिव्ज, रेजिनाल्ड स्पूनर (यष्टीरक्षक), डिक शॅकलटन, एड्डी पेंटर, जिम लेकर, जॉर्ज ट्राइब, लेझली एम्स (कर्णधार ) व सोनी रामदिन 

या सामन्यात बॉम्बे गव्हर्नर XI संघ पराभूत झाला तर कॉमनवेल्थ संघ विजयी झाला. पण ते महत्वाचे नाही !!

राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी यांनी पहिल्या डावात संघाच्या वतीने सर्वाधिक ६८ धावा केल्या ! 

राजा महाराज सिंह यांचा हा पहिलाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना होता आणि त्यात त्यांनी नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येऊन ४ धावा काढल्या !! मोठी गोष्ट आहे !!

राज्यपाल आपल्या एडीसीसह एकत्र खेळले असा हा कदाचित पहिलाच प्रथम श्रेणीचा सामना असेल ! 

योगायोग म्हणजे दोघांनाही इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकरने बाद केले. 

गोलंदाज जिम लेकर हा राजा महाराज सिंह यांच्या पेक्षा तब्बल ४४ वर्षांनी लहान होता !

आपला पहिला वहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळणारे मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह यांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये गेले ते यासाठी की दिनांक २५ नोव्हेंबर १९५० या सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांचे वय होते ७२ वर्षे १९२ दिवस !! 

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी राज्यपाल ब्रेबॉर्न स्टेडियमकडे फिरकलेही नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्या नावापुढे अनुपस्थित असे लिहिण्यात आले !