Home नागपूर जनतेच्या विश्वासाचा आधारवड कोसळला : दत्ता मेघे युगाचा अंत

जनतेच्या विश्वासाचा आधारवड कोसळला : दत्ता मेघे युगाचा अंत

127

विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अढळ ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाची बातमी ही केवळ एका व्यक्तीच्या जाण्याची घटना नाही; ती एका युगाच्या अस्ताची वेदनादायी जाणीव करून देणारी आहे. सार्वजनिक जीवनात सातत्याने सक्रिय राहून लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषद अशा विविध सभागृहांतून जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राने एक अनुभवी, दूरदृष्टीचा आणि समाजाशी नाळ जपणारा नेता गमावला आहे. दत्ता मेघे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. संसदीय व्यासपीठावर त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन शासनव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले, तर तो सत्तेच्या मोहाचा नव्हे, तर समाजकारणाशी नाळ जोडणाऱ्या आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वाचा प्रवास होता.

        विकासाच्या असमतोलाने दीर्घकाळ त्रस्त असलेल्या विदर्भासाठी दत्ता मेघे हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक ठाम आवाज होते. शेतीचे प्रश्न, उद्योगधंद्यांची कमतरता, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांची उणीव, या सगळ्या समस्यांकडे त्यांनी केवळ आकडेवारी म्हणून पाहिले नाही, तर त्या मागील मानवी वेदना समजून घेतल्या. म्हणूनच त्यांच्या भूमिकेत केवळ राजकीय आक्रमकता नव्हती, तर सामाजिक संवेदनशीलताही होती.

        राजकारणात त्यांनी सत्तेच्या गणितांपेक्षा विकासाच्या समीकरणांना प्राधान्य दिले. पक्षीय समीकरणांच्या गुंतागुंतीतही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख जपली. त्यांची शैली आक्रमक असली, तरी ती केवळ विरोधासाठी नव्हती; ती रचनात्मक टीका आणि पर्यायी विचार मांडण्यासाठी होती. शासनाच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी ठोस उपायही सुचवले, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य ठरते. दत्ता मेघे यांच्या कार्याचा सर्वात भक्कम पाया म्हणजे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळावी आणि ते आत्मनिर्भर बनावेत, यासाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी हजारो कुटुंबांचे आयुष्य बदलले. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विश्वासातून त्यांनी उभे केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.

       आज शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण चिंताजनक ठरत असताना, दत्ता मेघे यांनी शिक्षणाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. त्यांच्या संस्थांमधून घडणारे विद्यार्थी केवळ पदवीधर नाहीत, तर ते समाजाभिमुख नागरिक असतात, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच मोलाचे होते. वंचित आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील विषमता कमी व्हावी, संधींचे समान वितरण व्हावे, यासाठी त्यांनी कृतीशील भूमिका घेतली. त्यांच्या कार्यात घोषणाबाजीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व होते आणि हीच बाब त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. 

        आजच्या राजकारणात तात्कालिक फायद्यासाठी भूमिका बदलणारे, समाजाशी तुटलेले आणि केवळ सत्तेसाठी धडपडणारे नेतृत्व वाढताना दिसते. अशा काळात दत्ता मेघे यांसारख्या मूल्यनिष्ठ नेत्यांची उणीव अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील चढ-उतार स्वीकारले, पराभव पचवले; पण जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे बळ होते. त्यांच्या निधनाने एक मूलभूत प्रश्न समोर येतो की, आजच्या राजकारणात अशा प्रकारचे नेतृत्व घडवले जात आहे का? समाजाशी जोडलेले, विकासाला प्राधान्य देणारे आणि दीर्घकालीन दृष्टी असलेले नेते निर्माण होणे ही काळाची गरज आहे. निवडणुका जिंकणे हेच नेतृत्वाचे अंतिम मापदंड नसून, समाजावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम घडवणे हेच खरे नेतृत्व आहे, हे दत्ता मेघे यांच्या कार्यातून अधोरेखित होते.

       त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. मात्र, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी जबाबदारी आहे. त्यांच्या विचारांना, कार्यपद्धतीला आणि सामाजिक बांधिलकीला अनुसरून काम केले, तरच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. आज अनेकजण त्यांना शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत आहेत; परंतु खरी श्रद्धांजली ही कृतीतूनच व्यक्त होते. समाजासाठी काम करण्याची जिद्द, शिक्षणाला दिलेले प्राधान्य आणि विकासासाठी घेतलेली ठाम भूमिका, या मूल्यांचा स्वीकार केला, तरच त्यांच्या कार्याला खरी सलामी दिली जाईल. दत्ता मेघे यांचे आयुष्य हे संघर्ष, समर्पण आणि समाजसेवेचा जिवंत आदर्श आहे. त्यांनी ज्या मूल्यांसाठी आयुष्य झोकून दिले, ती मूल्ये आजही तितकीच महत्त्वाची आहेत. व्यक्ती निघून जातात, पण त्यांचे विचार आणि कार्य अमर राहतात, दत्ता मेघे हे त्यापैकीच एक. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९