चिमुरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपीना अटक- नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

595

🔺टायर पेटवून निषेध, सौम्य लाठीमार व दगडफेक…पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

✒️चिमूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.15एप्रिल):-शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर त्याच वॉर्डात राहणाऱ्या दोन आरोपींकडून दीर्घकाळापासून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (14 एप्रिल ) रात्री उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रशीद रुस्तम शेख (नड्डेवाला) आणि नसीर वजीर शेख (आईस गोलेवाला) या दोघांना अटक केली आहे.

पीडित दोन्ही मुली शाळकरी असून एकमेकींच्या शेजारी राहत होत्या. आरोपींनी ओळखीचा फायदा घेत मार्च महिन्यापासून खाऊचे आमिष दाखवून त्यांना घरी बोलावून अत्याचार केला. प्रथम रशीद शेख याने, तर त्यानंतर नसीर शेख याने त्याचप्रकारे दुसऱ्या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलींच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दोघांवरही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल करत आहेत.

🔺नागरिक संतप्त – पोलिस ठाण्याला घेराव

घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. शेकडो नागरिकांनी चिमूर पोलीस ठाण्याबाहेर धडक मारत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या अशा घोषणा देत त्यांनी पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

🔺टायर पेटवून निषेध, सौम्य लाठीमार व दगडफेक

नागरिकांच्या रोषाला उधाण आल्याने त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर टायर पेटवून निषेध केला. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना जमाव ऐकत नसल्याने पोलीस दलाने सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. मात्र, या दरम्यान काही संतप्त युवकांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केल्याची माहिती आहे.

🔺वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रात्रीच पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी अतिरिक्त पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेतली. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. सध्या शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.