(5 ते 14 एप्रिल: अशोकाष्टमी- सम्राट अशोक जयंती सप्ताह विशेष.)
चैत्र शुक्ल अष्टमी रोजी दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी केली जाते. बिहार सरकारने २०१६मध्ये दि.१४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशीच अशोक जयंती असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती. दि.४ एप्रिल २०१७ मध्ये सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावरून आज ती २,३२९वी आहे. हे तीनही दिवस भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमी आहेत. ज्ञानवर्धक संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजींच्या शब्दांत प्रस्तुत…
सम्राट अशोक मौर्य यांचा जन्म इ.स.पू.३०४मध्ये झाला असावा असा अंदाज वर्तवला जातो. हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते. त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ – इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते. अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यांना सम्राट अशोक मौर्य, धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानाम प्रिय:, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मानायक, धर्मनायक, अशोक महान अशा अनेक नावाने ओळखले जाते.
बालपण व सुरुवातीची कारकीर्द: अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्नी होत्या, त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आले आहे आणि ती एका राज्याची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेली आहे तत्कालीन अशोकाचे शिलालेख, वास्तु हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत. सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासातही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट.
जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत.
अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन १८३७मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी, खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राह्मी लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्याविषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला ‘देवानाम प्रिय’ असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महान आहे, मात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
राज्यारोहण: सम्राट अशोकच्या काळातील मौर्य साम्राज्याचा विस्तार
अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुःस्वासही वाढत गेला. अशोकांनी मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. तसेच त्यांच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्यांची राज्यभर कीर्ती दुमदुमू लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुःस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला. अशोकांच्या यशाने त्यांच्या भावांचा दुःस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्यांनी पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाऊन वास्तव्य केले. या काळात त्यांची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत. मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापाऱ्याची मुलगी होती. ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.
अशोकांची पुढील काही वर्षे शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सनपूर्व २७३मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली. राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणारा चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो रोमिला थापर यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे.
बौद्ध धम्माचा स्वीकार व प्रसार: अशोकांनी कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल? बायका मुले व इतर अबलांच्या हत्या कशासाठी? आणि यात कसला पराक्रम? असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले अग्नीय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोई निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती अनेक नवे रस्ते बांधले प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली नव्या धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं, त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकांनी केले. सन १९७१ साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया प्रत्यक्षात नक्तितालाई या खेड्याजवळ सापडला.
या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारे होते, हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत नक्तितालाई येथे सहलीला आले होते, असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते, याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.
अशोकांच्या या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धम्माची शिकवण दिली, यामुळे भारतापुरता मर्यादित राहिलेला हा धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकांनी बौद्धधम्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकांनी बांधला असे मानतात. अशोकांनी आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकांनी सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्यांच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातिधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. अशोकांनी आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रिपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली. अशोकांनी आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकांचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकांना धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकांनी धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही.
अशोकांच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही, परंतु त्यांना शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकांनी पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे बौद्ध धम्म स्वीकारला तरी त्यांच्या शेजारी राज्यांनी त्यांना छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धरम्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती, असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते. इतिहासकारांच्या मे त्यांचा मृत्यू इ.स.पू.२३२मध्ये झाला.
!! चक्रवर्ती सम्राट अशोकांना अशोकाष्टमी निमित्त सप्ताहभर विनम्र अभिवादन !!
✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.रामनगर, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883