ने.ही. विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा – विशाल जनबंधू याला राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

280

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12एप्रिल):-नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी विशाल उत्तम जनबंधू याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती ही अत्यंत प्रतिष्ठेची असून, विशालला रु. ५०००/- चा धनादेश प्रदान करण्यात आला.

ही शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक श्री कपूर नाईक यांनी विशालला धनादेश सुपूर्त केला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री नाकाडे सर पर्यवेक्षक श्री प्रकाश जिभकाटे, तसेच श्री वदनलवार सर, श्री पराते सर, श्री बोदले बाबूसाहेब, श्री कळंबे सर, श्रीमती कापगते मॅडम, कुमारी देशमुख मॅडम, कुमारी शिवानी कुथे मॅडम आणि कोठेवार मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विशालच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून,संस्थेचे सचिव आदरणीय श्री अशोकजी भैया साहेब व सर्व सदस्य यांनी विशालचे अभिनंदन केले .विशाल च्या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे. मुख्याध्यापक श्री कपूर नाईक यांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि हे यश संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.