17 एप्रिल रोजी आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार वाटप

104

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16एप्रिल):-पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा निधी शैक्षणिक उद्देशासाठी खर्च व्हावा या उदात्त हेतूने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत गुरुवार 17 एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात दुपारी 3 वाजता ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथालयांना पुस्तके आणि जिल्ह्यातील शाळांना संगणकांचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे.

संगणक आणि मोबाईलच्या युगात ग्रंथालय ओस पडू लागली आहेत. विशेष म्हणजे ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत. आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करियरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयावरची अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून आवश्यक असलेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रंथालयांना आमदार अभिजित वंजारी आपल्या आमदार निधीतून देणार आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर घालण्यासाठी जिल्ह्यातील काही निवडक शाळांना आमदार निधीतूनच संगणकांचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार अभिजित वंजारी यांनी पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानंतर ही अभिनव संकल्पना मांडली आणि पहिल्या वर्षांपासून हा उपक्रम सुरू करून अंमलबजावणी केली. याअंतर्गत यावर्षी ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी असतील. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्राशी आणि ग्रंथालयाशी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.