माण-खटाव च्या पाण्यासाठी जनआंदोलन ३० एप्रिलला होणारच! : महेश करचे

90

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड/सातारा(दि.29एप्रिल):- सातारा जिल्ह्यातील अतिदुष्काळी माण-खटाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न भीषण बनला आहे. अनेक गावांमध्ये केवळ चार दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने जनतेचा संताप उसळला आहे. तारळी सिंचन योजनेतून कॅनॉलद्वारे नियमित पाणी मिळावे, या मागणीसाठी ३० एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे.

आंदोलन थांबवण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत दबाव आणला जात आहे, मात्र संतप्त जनता आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन निश्चितपणे पार पडणार आहे.

प्रशासनाने कॅनॉल परिसरात पाणीचोरी रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली असली, तरीही पाण्यासाठी झगडणाऱ्या नागरिकांचा रोष ओसंडून वाहत आहे.

“आम्ही जर तहान भागवताना चोर ठरणार असू, तर आम्हाला अटक करा. निदान जेलमध्ये तरी पाणी मिळेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ३० एप्रिल रोजी जनावरांसह अर्धनग्न आंदोलन करत प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली जाईल.

सध्या माण-खटाव भागात पाण्याचा तुटवडा असह्य पातळीवर पोहोचला आहे. प्रशासनाकडून काही प्रमाणात पाणी सोडले जात असले तरी, अर्धवट सिंचन प्रकल्प व अपूर्ण पाइपलाइनमुळे अनेक गावं आणि वस्त्यांना पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढत आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न केवळ तहान भागवण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो प्रशासनाच्या संवेदनशीलतेची आणि कार्यक्षमतेची मोठी परीक्षा ठरत आहे.