डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात संपन्न

52

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12एप्रिल):- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, अँड सायन्स येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिवादनावर तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. देवेश कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेच्या सदस्या व समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुहास बिजागरे विचारमंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना तत्कालीन स्वयंघोषित समाजसुधारकांपेक्षा त्यांच्या विचार आणि कार्याची प्रामाणिकता स्पष्ट करून तथाकथित समाजसुधारकांच्या दुटप्पी वृत्तीवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुहास बिजागरे यांनी ‘सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले’ या विषयावर मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा आणि सत्यशोधक चळवळीच्या योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसुधा देवगडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. माला खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मोनिका रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले.