✒️मूल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुल(दि.16एप्रिल):-श्रमिक एल्गार , एल्गार प्रतिष्ठान आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषेच्या संयुक्त सहकार्याने चितेगाव येथे श्रमिक एल्गार परिसरात ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. औचित्य होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणांचे.
या ग्रामगीता महोत्सवाचे उद्घाटन श्रमिक एल्गारच्या संस्थापिका एड. पारोमिता गोस्वामी यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर सुप्रसिद्ध अधिवक्ता एड. कल्याण कुमार, परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, चितेगाव चे उपसरपंच हरिदास गोहणे , विजय सिध्दावार यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सिद्धावार यांनी केले तर ग्रामजयंती निमित्ताने एड. राजेंद्र जेनेकर यांनी विचार मांडले. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतून श्रमिक एल्गारला कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. आणि आज सर्वांच्या साक्षीने महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणे हे आमचे भाग्य आहे, असे एड. गोस्वामी म्हणाल्या. वं. राष्ट्रसंतांचे समग्र साहित्य गावागावात वाचले गेले पाहिजे कारण या साऱ्या ग्रंथात आपल्या गावाचे दर्शन घडते आणि आपल्याला उत्थानाचा मार्ग गवसतो, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.
याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ कोहपरा ,पेंढरी , पंचाळा , चिंचोली खुर्द, नलफडी, चुनाळा, कुडेसावली, मानोली बु , सहकारनगर रामपूर, देवाडा, बोडगाव,भुरकुंडा आदी २५ निवडक गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांचा सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामगीता महोत्सवाच्या निमित्ताने लताताई ठमके,रत्नाकर नक्कावार, प्रल्हाद उईके, मधुकर भगत, विलास चौधरी , बाबाजी लेंडागे,बबन चंदनकर, भागरथाबाई व-हाटे,मोहन वडस्कर, विश्वास सूर, विनायक सोयाम, भास्कर लोहबळे, जनार्दन हिंगाणे, अमित राऊत, ॲड.सारिका जेनेकर, पांडुरंग शेंडे, किशोर राऊत, रोहिणी मंगरूळकर आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपस्थित प्रतिनिधींनी आपले ग्रामविकासाचे कार्यसंकल्प जाहीर केले.
श्री. बावणे महाराज(वानेरी) यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. श्रावण बाणासुरे यांनी केले तर मनोहर बोबडे यांनी आभार मानले. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यक्रम स्थळी संघटक संदीप कटकुरवार यांनी व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी लावली होती.