✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.17एप्रिल):– ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे 14 एप्रिल 2025 रोजी बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आयोजन करण्यात आले होते.
या गौरवपूर्ण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे, प्रा. संदीप मेश्राम, प्रा. निलेश ठवकर, प्रा. डॉ. मृणाल वरहाडे आणि प्रा. डॉ. सुमेध वावरे यांची उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणादायी जीवनाचा विद्यार्थ्यांपुढे प्रभावी पट उलगडला. त्यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक संघर्षाचे महत्त्व, सामाजिक न्यायासाठी केलेले प्रयत्न आणि संविधाननिर्मितीतील मोलाचे योगदान यावर सखोल विवेचन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुमेध वावरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. बीजनकुमार शील यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन प्रा. विवेक माणिक यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात बाबासाहेबांविषयी अभिमान आणि प्रेरणा यांचा उत्स्फूर्त अनुभव यावेळी दिसून आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन हे महाविद्यालयाच्या सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणिवेचे प्रतीक ठरले.



