सध्या महाराष्ट्रात आंबा सीझन जोरात सुरू आहे. मुंबईच्या वाशीचे (Vashi) अेपीएमसीच्या (APMC) बाजारात सुमारे एक लाख आंब्याच्या पेट्यांची आवक होत असून पुणे, कोल्हापूर, सांगली इ. ठिकाणीसुद्धा आंबा सीझन जोरात असल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या मुख्यत्वे हापूस आंब्याची मोठी आवक होत असून केसर, पायरी, रत्ना इ. जातीचे आंबेही काही प्रमाणात पहायला मिळतात. भारतीय समाजामध्ये आंब्याची फार लोकप्रियता असून सर्व थरातील लोक आपल्या आवडीनुसार तसेच खिशाला परवडेल अशा आंब्यांची खरेदी करतात. कोकणातील हापूस आंब्याला सर्वांची पसंत असते. परंतु बाजारामध्ये काही फसवणुकीचे प्रकारही होत असल्याचे आढळते. यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारची फसवेगीरी आढळते.
पहिला म्हणजे कोवळ्या आंब्याला कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा लावून पिकविणे. आणि दुसरी म्हणजे कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूसची विक्री करणे याबाबी आहेत. फळे पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी बाजारातील चांगला दराचा फायदा घेण्यासाठी अपरिपक्व फळांना कॅल्शियम कार्बोनेट ची मात्रा देतात. यासाठी कॅल्शियम कार्बोनेट पावडर च्या पुड्या आंब्याच्या पेटीत ठेवतात. हवेतील आद्रतेने कॅल्शियम पावडरमधून ॲसिटिलन गॅस निर्माण होतो. या ॲसिटिलीन गॅसमुळे आंबा किंवा केळी सारख्या अपरिपक्व फळामध्येसुद्धा पिकण्याची क्रिया सुरू होणे आणि आंब्याच्या फळाचा हिरवा रंग जाऊन चांगला पिवळसर आकर्षक रंग येतो. त्यामुळे फळे आतून पिकलेली नसूनसुद्धा फळाच्या बाहेरील आकर्षक रंगाने गिऱ्हाइकाची फसवणूक होते अशा फळांची चव नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत फारच अपूरी असते आणि ग्राहक फसतात.
याशिवाय महत्त्वाचे म्हणजे अपरिपक्व फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटच्या मधून उत्पन्न होणाऱ्या ॲसिटिलीन गॅसमुळे कॅन्सरसारखी भयानक रोगसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा, केळी किंवा इतर कोणतीही फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटच्या वापरावर सरकारने (FSSAI) २०११ मध्ये बंदी घातली आहे. तरीपण चोरटेपणाने आंबा, केळी यासारखी अपरिपक्व फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो आणि त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते. अशी फसवणूक टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेने बाजारामध्ये फळांची नमुने घेऊन प्रथक्करण करून दोषी लोकांना शिक्षा केली पाहिजे. बाजारामध्ये मोसमाच्या सुरुवातीच्या काळात अधिक दराचा फायदा घेण्यासाठी मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते.
कोणती फळे कॅल्शियम कार्बोनेट वापरून पिकवलेली आहेत हे केवळ वरकरणी देखाव्यावरून कळत नसल्याने ग्राहकाची फसवणूक होते. हे टाळायचे असेल तर सरकारी यंत्रणा याबाबतीत अधिक सज्ज असणे आवश्यक आहे.हापूस आंब्याच्या उत्तम चव, स्वाद, दिखाऊपणा यामुळे हापूस आंब्याला बाजारात जास्त मागणी असते. तसेच दरही अधिक मिळतात. विशेषतः कोकणातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर) आंब्याची चव, स्वाद आणि तेथील विशिष्ट जमीन हवामान उत्पादनाच्या विशिष्ट पद्धती यामुळे हापूस आंब्याला, मुळ विशिष्ट प्रकारचा उत्तम चव, स्वाद, रंग असतो म्हणून कोकणातील आंब्याला G-I मानांकन दिलेले आहे. हापूस आंबा लागवडीपासून चांगला नफा मिळत असल्याने महाराष्ट्राच्या कोकणाबाहेरील काही जिल्ह्यांत तसेच कर्नाटकाच्या उत्तरेकडील धारवाड, बेळगाव, कोप्पल, हावेरी इ. जिल्ह्यांमध्ये तसेच तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये लागवड केलेली असून तेथील हापूस फळे महाराष्ट्रातील मुंबईच्या मुख्य मंडईमध्ये तसेच काही मोठ्या शहरामध्येही विक्रीसाठी येत आहेत.
कोकणाशिवाय इतरत्र ठिकाणी हापूसची लागवड करून अधिक उत्पादन जरी मिळाले तरी हापूस आंब्यांना कोकणातील विशेषतः देवगड भागातील हापूस आंब्याच्या तोडीची चव, स्वाद, रंग इ. येत नाही. तरी सुद्धा कोकणाबाहेरील हापूस आंब्यापासून कोकणातील हापूस उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी कोकणातील हापूस आंब्याला Alphanso Geographical identification (G-I tag) Geographic indication Registry या केंद्रीय सरकारच्या व्यापार विभागातर्फे सन १९९९ च्या कायद्यानुसार दिलेले आहे. कोकणाबाहेरील कर्नाटकासारख्या भागातून उत्पादित झालेले हापूस कोकणातील हापूस विशेषतः देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे हापूस नावाखाली खरेदी केलेल्या ग्राहकाची मोठी फसगत होत आहे. तसेच कोकणातील खरे जी-आय मानांकित हापूस आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी कोकणातील सर्व हापूस आंबा उत्पादकांनी आपल्या मालावर हापूसचे जी-आय टॅग लावणे जरूरीचे आहे. तसेच हापूस आंबे खरेदी करणाऱ्या ग्राहकानेही आंबे खरेदी करताना अधिक चौकशी करून हापूस आंबे खरेच कोकणातील उत्पादित आहे का? याची खात्री करून आंबे विकत घेतले पाहिजेत.हा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावी अशा ब्लाॅकचेन, स्मार्ट टॅग, क्यूआर कोड इ. मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. परंतु कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी तसेच हापूस आंबा खरेदी करणाऱ्यांना अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.
✒️डाॅ. आर. टी. गुंजाटे(जगविख्यात फलोउद्यानतज्ज्ञ)