महसूलासाठी सरकारचे व्यसनाला प्रोत्साहन-अविनाश पाटील यांचा आरोप

140

▪️विवेकवसा फाउंडेशनचे व्यसन विरोधी शिबीर 

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.29एप्रिल):-व्यसनामुळे मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येते. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. राष्ट्र आणि मानवसमाज हित धोक्यात येते, असे असतानाही व्यसनाजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला महसूल मिळतो म्हणून सरकार व्यसनाला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील यांनी केला आहे. 

विवेकवसा फाउंडेशनने ‘गुंता व्यसनांचा, धडा मुक्तीचा’ या व्यनसविरोधी विषयावर आयोजित केलेल्या शिबिरात अविनाश पाटील बोलत होते. सिगारेटची प्रतिकृती मोडून अनोख्या पद्धतीने शिबिराचे उद्घाटन माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. धनंजय अष्टुरकर, माणिकधारा संस्थेच्या अध्यक्षा प्रतीक्षा दापुरकर, विवेकवसा फाउंडेशनचे संघटक विशाल विमल यांनी मांडणी केली. या शिबिरात भूषण सुकेशनी वामनराव, मुकेश रजपूत, प्रमिला येडगे, आकाश छाया, नीलकमल सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. व्यसनमुक्ती दूत म्हणून इस्माईल शेख आणि कमलेश मेतकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

व्यसनामुळे व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होत असताना दुसऱ्या बाजूला समाजात व्यसनासंबंधी विरोधाभास दिसतो. महसुलासाठी सरकार व्यसनाला प्रोत्साहन देत असून व्यसनाजन्य पदार्थांची निर्मिती वितरण करणारी लॉबी कार्यरत आहे. तसेच व्यसनाला प्रतिष्ठा असून सरकार दरबारी स्थान आहे. व्यसनमुक्त समाजासाठी व्यसनविरोधी सहमती तयार करावी लागेल. त्यासाठी प्रबोधन, धोरण कायदे आणि योजना आवश्यक आहे, असे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. व्यसनामुळे समाज स्वास्थ्य तर बिघडतेच पण मोबाईलसारख्या व्यसनामुळे धार्मिक द्वेष पसरतो. मोबाईलमुळे स्वतःचा मेंदू वापरला जात नाही. स्वभावात द्वेष, संयमाचा अभाव, हिंसा, आत्महत्या अश्या प्रवृत्ती वाढल्या आहे. मोबाईल बाजूला ठेवून मेंदू शुद्ध (डिटॉक्स) करण्याची गरज आहे, असे डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

सुप्रिया गायकवाड, प्रवीण खुंटे, रोहिणी कांबळे, स्वप्नील भोसले, शाम येणगे, आदित्य माने, सुयोग काशीकर, समाधान भगत, रविकांत आदरकर, राजेंद्र पोतराजे यांनी शिबिराचे संयोजन केले.