

✒️रोशन मदनकर(उप संपादक0
गडचिरोली(दि.29एप्रिल):-चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी येथील वैनगंगा नदीवर सुमारे २१० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाला वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच मोठे भगदाड पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुलाच्या कामातील निकृष्ट दर्जामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील खनीजाची वाहतूक करून आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठी शासनाकडून जिल्ह्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असून राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना देखील राष्ट्रीय महामार्गाचे काम असतील किंवा जिल्ह्यातील इतरही रस्ते कामाच्या गुणवत्तेशी तडजोड होत असल्याचे चित्र या पुलाच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या पुलावर मोठा आणि खोल खड्डा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे पुलाचे अधिकृत उद्घाटन आणि लोकार्पण होण्यापूर्वीच अशी अवस्था झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित अभियंत्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील प्रशासनाकडून कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच पुलाच्या गुणवत्तेचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.







