🔺दाम्पत्याकडून 65.14 लाख रुपयांची फसवणूक
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
भंडारा(दि.16मे):-दोन व्यक्तींना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आणि एकाला पेट्रोल पंपची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ब्रह्मपुरीतील नाकतोडे दाम्पत्यानी 65.14 लाख रुपयांची फसवणूक केली. पीडिताना फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दाम्पत्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यात आरोपी विरुध्द कलम 420, 407, 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
रोशनी नाकतोडे (29) आणि रोमल नाकतोडे (37, दोघेही विदर्भ कॉलनी, मालडोंगरी रोड, ब्रह्मपुरी, जि चंद्रपूर अशी या आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 1 एप्रिल 2022 ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत रोशनी आणि रोमल यांनी लाखांदुरातील वॉर्ड क्रमांक 11 मधील शिवनगरी लेआउट येथे राहणारे रूपेश गावतुरे (46) यांना पेट्रोल पंपची डीलरशिप देतो, असे सांगून 53 लाख 28 हजार 837 रुपयांची फसवणूक केली . रूपेश यांचा मेहुणा नितेश गुरनुले हा देखील या दाम्पत्याच्या संपर्कात आला. त्यालाही सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडूनही 53 हजार 289 रुपये घेतले. एवढेच नाही तर, समीर ब्राह्मणकर यालाही ग्रामसेवकाची नोकरी मिळवून देण्याच्या नावाने 11 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केली.
दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ना पेट्रोल पंप मिळाला; अथवा ना नितेश आणि समीरला नोकरी मिळाली नाही. एवढेच नाही तर, रक्कमही परत दिली नाही. एकाच शहरातील तिघांना लाखोंचा गंडा घालणारे दाम्पत्य चालाख आहे. आपले वरपर्यंत संबंध असल्याचे भासवून आणि गोड बोलून या पती-पत्नीने सलग दोन वर्षांच्या काळात पैसे उकळले. मात्र त्यांच्या चालाखीमुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षातच आले नाही. पोलिसांनी त्यांच्या पत्त्यावर जाऊन ब्रह्मपुरीत शोध घेतला, मात्र ते पसार झाले असल्याचे आढळले.
पीडितानी लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. रूपेश गावतुरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.