राजुरात प्रथमच बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन

55

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.2एप्रिल):- श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीताप्रणित बाल सुसंस्कार शिबिर दि. 06 मे 2025 ते 16 मे 2025 पर्यंत आयोजित केलेले आहे.

        वंदनीय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतातील वैज्ञानिक विचार समोर ठेवून आजच्या मुला मुलीचे जीवन सुंदर, स्वाभिमानी, चरित्रवाणी देशभक्त बनून त्यांच्या अंगी स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता इत्यादी गुणाची वाढ व्हावी. मुला मुलींना बालवयात सुसंस्काराची सवय लागून आदर्श दिनचर्येचे पालन व्हावे याकरिता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात आत्तापर्यंत 160 मुलांची नोंदणी झाली आहे.

     शिबिरातील अभ्यासक्रम अध्ययनात सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता पठण आदर्श दिनचर्या,समूह गान, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता थोर पुरुषाचे चरित्र दर्शन, सुप्त गुणांना वाव, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाटीकाटी, दांडपट्टा, मनोरे, मराठी हिंदी भजने,स्वागत गीते, ताल,स्वर, हावभाव तसेच सामान्यज्ञान इत्यादी राहणार आहे.

    शिबिराची दिनचर्या पहाटे 4:30 वा. प्राप्त जागृती, 5:30 वा. सामुदायिक ध्यान, 6:00 ला प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार, 7:00 वा. लाठीकाठी, दांडपट्टा, लेझीम,कवायत, 8:00 वा. अल्पोहार, 9:00 वा. बौद्धिक,10:30 वा.संगीत व चर्चा सत्र,12:00 ते 3:00 वा. भोजन व विश्रांती, 3:00 वा. अध्यात्मिक व शैक्षणिक विषय उजळणी, 4:30 वा. लाठीकाठी कवायत कराटे, 5:30 वाजता लघू विश्रांती, 6:00 वा. सामुदायिक प्रार्थना, मार्गदर्शन,सामान्यज्ञान 7:30 वा. भोजन, 8:30 वा. संगीत व चर्चासत्र, 9:30 वा. राष्ट्रवंदना व निद्रापूर्वक प्रार्थना याप्रकारे दिनचर्या राहील. 

       शिबीरासाठी मुख्य प्रशिक्षक ह.भ.प. स्वामिनी गौरीताई विटोले नागपूर, स्नेहल संतोष राऊत, गुरुकुंज आश्रम मोझरी, चेतनदादा अंभोरे, गुरुकुंज आश्रम मोझरी, सहाय्यक प्रशिक्षक नामदेवराव आस्वले,प्रचारक भद्रावती, उषाताई टोंगे, गडचांदूर, अनिल काकडे,राजुरा, अनिल चौधरी राजुरा, लोमेश मडावी, राजुरा मधुकरजी शेरकी, राजुरा तसेच कायदेविषयक मार्गदर्शक ऍड. मारोती कुरवटकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

    शिबिराचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने केले आहे.