

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.13मे):- गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा सिंचन योजना (TSP), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना तसेच “मागेल त्याला विहीर” रोजगार हमी योजना अंतर्गत आपल्या शेतात विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, दीड वर्षापर्यंत पेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना सुद्धा अद्याप या विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विहिरीचे काम पूर्ण केले आहे. शासनाच्या योजनांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची तरतूद असतानाही, प्रत्यक्षात लाभार्थ्यांकडून प्रशासनाकडे निधी संदर्भात विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे दिले जातात. सदर प्रक्रियेमुळे गरिब शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. मार्च महिन्यातच हे पैसे मिळायला हवे होते, परंतु प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अजूनही पैसे अडकून पडले आहेत. जिल्ह्यात दोन पालकमंत्री असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण सुटत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून योजनांचा उद्देश फोल ठरत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून ही प्रकरणे निकाली काढावीत व लाभार्थी शेतकऱ्यांना थकीत असलेले विहिरीचे पैसे तात्काळ देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
आठ दिवसात शेतकऱ्यांना निधीचे वितरण न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे



